Tue, Sep 25, 2018 11:13होमपेज › Pune › 'इंद्रियसुख' महामंडळ करा; शिवसेनेचा टोला

'इंद्रियसुख' महामंडळ करा; शिवसेनेचा टोला

Published On: Feb 15 2018 4:43PM | Last Updated: Feb 15 2018 4:43PM
पिंपरी : प्रतिनिधी 

अवांतर आणि पूरक वाचनाच्या नावाखाली ‘बाल नचिकेत’ या नावाच्या पुस्तकात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इंद्रियसुखाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामध्ये मीलन, कामातुर आणि कौमार्यभंग अशा शब्दांचा वापर केला आहे. पूरक वाचनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना इंद्रियसुखाचे धडे देण्याचा प्रकार विघातक असून, या प्रकाराचा शिवसेनेने निषेध केला आहे. 

याबाबत काळेवाडी विभागप्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कोणतीही चांगली योजना अमलात आणली नाही. याउलट महाराष्ट्राचे भवितव्य असलेल्या नवीन पिढीला बेताल वक्तव्य करून वाममार्गाला लावण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे करीत आहेत. पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकामधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या मनावर विपरीत परिणाम घडविणारे शब्द वगळण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

राज्य सरकारने येत्या काही दिवसांत इंद्रियसुख नावाने नवीन महामंडळ सुरू करावे. त्याच्या अध्यक्षपदी विनोद तावडेंची निवड करण्याची उपरोधिक मागणी केली आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या स्वाक्षरी लागल्यास स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.