Wed, Jun 26, 2019 18:12होमपेज › Pune › ‘महात्मा फुलेंना आदर्श मानत असल्याने पागोट्याचा आग्रह’

शरद पवारांकडून पगडीची फिरवाफिरव सुरुच

Published On: Jun 16 2018 3:48PM | Last Updated: Jun 17 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

समता, परिवर्तन, स्री शिक्षण आणि विज्ञानाचा पुरस्कार करणार्‍या महात्मा फुले यांचा विचार पुढे नेणे ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे. मध्यंतरी मी पगडीबाबत काही बोललो, त्याची चर्चा देशात होतेय. ज्यांना आदर्श मानतो, त्या महात्मा फुलेंचा पागोटे वापरावे हाच हेतू होता. त्यातून बरीच मंडळी रागावली. मात्र, यात माझा कोणाच्याही भावना दुखविण्याचा काही हेतू नव्हता. या पुण्यात वाढलो, घडलो असून, मला या शहराचा अभिमान आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

पुणे आता बदलत आहे, ही चांगली बाब आहे. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना 80 वर्षांनी का होईना प्रवेश मिळतोय याचा अर्थ पुणे बदलत आहे आणि मुलींना शिक्षण देणे हा महात्मा फुलेंचा दृष्टिकोन होता, असेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पद्मावती येथील डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रसगांचा भित्तिशिल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव हे हेाते. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, चेतन तुपे, स्थानिक नगरसेविका अश्‍विनी कदम, नितीन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 पवार पुढे म्हणाले की, जीवनात शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श असून त्यांचे विचार आणि जीवन मी नेहमी विविध कार्यक्रमातून मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती एकच असतात. या स्थितीत शाहू महाराजाची पगडी सामान्यांना उपलब्ध होत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दैनंदिन जीवनात टोपी घालत नव्हते. त्यांनी परदेशात असताना हॅट वापरली असेल. या स्थितीत महात्मा फुले यांचे पागोटे घातले. कार्यक्रमांमध्ये देण्यात येत असलेल्या भेटवस्तुंऐवजी समाजाला दिशा देणारी पुस्तके देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

 डॉ. बाबा आढाव म्हणाले की, सावित्रीच्या लेकींना संधी दिल्यावर त्या धडाडीने कशा पुढे जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरसेविका अश्‍विनी कदम या आहेत. त्यांनी कार्यक्रमात  पवार यांचा सन्मान महात्मा फुले यांचा पागोटे घालून केला. तर सावित्रीबाई फुले यांच्या शाळेचे स्मृतीचिन्ह भेट दिले. पवार यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात पागोटे दिले. त्यावरून बरीच चर्चा झाली. मात्र, कोणी जर या पागोट्याला जातीचे प्रतीक मानत असतील तर अशी माणसे मनाने कोती आहेत. पागोट्यामागचा विचार महत्त्वाचा आहे.