Wed, Jul 24, 2019 05:45होमपेज › Pune › मतांवर डोळा ठेवून पवार पगड्या बदलतात : तावडे

मतांवर डोळा ठेवून पवार पगड्या बदलतात : तावडे

Published On: Jul 02 2018 4:44PM | Last Updated: Jul 02 2018 4:44PMपुणे : प्रतिनिधी 

फुले, शाहु, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, बहुजन समाजाच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदरणार्‍या पवारांनी राज्य सरकारला पाठवलेल्या राजकीय पत्राला उत्तर देण्याची गरज नाही. अशी टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सिंबायोसिसच्या पदवीप्रदानाच्या कार्यक्रमात बोलताना केली. 

विनोद तावडे सिंबायोसिसच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसर्‍या पदवीप्रदान सोहळ्यासाठी पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वात वाईट असल्याची टिका करत याबाबत सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचेही पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

या पत्राबाबत तावडेंना विचले असता, तावडे म्हणाले की, शरद पवार यांच्या सारखी अभ्यासू माणसे निवडणूक आली की पॉलिटिकल बोलत असतात. तसेच जो पत्रव्यवहार राजकीय असतो त्याला उत्तर देण्याची गरज नसते. 

साहित्य महामंडळाचा निर्णय स्वागतार्ह 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता बाद झाली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून राज्याच्या ११ कोटी जनतेच्या वतीने मी साहित्य महामंडळाचे अभिनंदन करतो. आता निवडणूक नाही, तर निवड होईल. त्यामुळे साहित्य संमेलन कोणत्याही वादाविना पार पडेल, त्यामुळे खऱ्या साहित्याचा आनंद घेता येईल, असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले.