Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Pune › पवारांनी पुणेरी पगडी  नाकारुन केला पुणेकरांचा अपमान : राऊत

पवारांनी पुणेरी पगडी  नाकारुन केला पुणेकरांचा अपमान : राऊत

Published On: Jun 13 2018 1:54AM | Last Updated: Jun 13 2018 1:54AMभवानी पेठ : वार्ताहर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा घोर अपमान केला असल्याची घनघनीत टीका शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली

महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान व शिवसेना कसबा विभागाचे वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राऊत यांनी पगडी परिधानही केली.
रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जुन छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला. त्यावरून राजकीय चर्चेला आता नवीन उधाण आले आहे.

त्यामुळे शिवसेनेनेही आता या वादात उडी घेतली असून राऊत यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात पवार यांच्यावर आपल्या भाषणात निशाणा साधला. ते म्हणाले की, पवार यांनी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला आहे.त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. या मागचा अर्थही लवकरच समोर येईल. तसेच कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या किन्नर यांचा सन्मान करताना ते पुढे म्हणाले की, किन्नर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात. त्यांचे समाजाने कौतुक करावे. उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशात किन्नर आमदार आहेत. महाराष्ट्रातही विधानसभेत त्यांना स्थान मिळावे. 

हा कार्यक्रम महात्मा फुले मंडई येथे कै. सतीशशेठ मिसाळ वाहनतळ येथे संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या तृतीय पंथी कार्यकर्ते, पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वर्तमानपत्र वाटप करणार्‍या विक्रेत्यांना रेनकोट वाटप तसेच महिला भगिनींना छत्री व पर्यावरण पूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन कसबा विधानसभा मतदार संघाचे विभाग प्रमुख  व  महत्मा फुले मंडई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी केले होते. याप्रसंगी आमदार महादेव बाबर, आमदार चंद्रकांत मोकाटे, संपर्क प्रमुख अजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, प्रशांत बधे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पैलवान राजेश बरगुजे, युवराज पारीख, राजेंद्र शिदे आदी उपस्थित होते.