Sun, Apr 21, 2019 06:18होमपेज › Pune › कार्ला फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात सात ठार, तीन गंभीर जखमी

कार्ला फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात सात ठार, तीन गंभीर जखमी

Published On: Jul 15 2018 5:42PM | Last Updated: Jul 15 2018 5:42PMलोणावळा : वार्ताहर 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ कार्ला फाटा येथे दोन कारच्या धडकेत  सात जण जागीच ठार झाले. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. तीन युवकांचाही यात समावेश आहे. ही दुर्घटना रविवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, यात दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. 

या अपघातात स्विफ्ट कारमधील संजीव मोहनसिंग कुशवाह (वय 17), कृष्णा रमेश सिरसाट (22), निखिल बालाजी सरोदे (20, सर्व रा. राहटणी,पिंपरी-चिंचवड) या तिघांचा मृत्यू झाला, तर सॅन्ट्रो कारमधील एकाच कुटुंबातील राजीव जगन्नाथ बहिरट (वय 52), सोनाली राजीव बहिरट (वय 46), जान्हवी राजीव बहिरट (वय 20) आणि जगन्नाथ चंद्रशेखर बहिरट (83, सर्व रा. बी. टी. कवडे रोड, कलाशंकर नगर, मुंढवा) या चौघांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कारमधील प्रतीक बालाजी सरोदे (वय 18), आकाश मदने (वय  17), रोहित कड (वय 16) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावरील कार्ला फाटा येथे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट कार (एमएच 14 सीएक्स 8339) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध बाजूस गेली. त्याच वेळी लोणावळयाहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या सँट्रो कार (एमएच 12 ईएक्स 1682)ला स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली. दोन्ही कारचा वेग जास्त असल्याने या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.

या अपघातानंतर पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तसेच आयआरबीच्या देवदूत टीमने सर्वप्रथम दोन्ही कारमध्ये अडकलेल्या जखमी तसेच मृतांना बाहेर काढले. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे नि. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

कलाशंकरनगरवर शोककळा

लोणावळ्याजवळ कार्ला फाटा येथे दोन कार झालेल्या भीषण अपघातात बहिरट (रा. मुंढवा) कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेने मुंढवा येथील बीटी कवडे रोडवरील कलाशंकरनगरवर शोककळा पसरली आहे. जगन्नाथ बहिरट हे आपल्या कुटुंबीयांसमवेत  गेल्या 15 वर्षांहून अधिककाळ  कलाशंकरनगरध्ये वास्तव्यास  आहे. त्यांच्या घरी पत्नी प्रमिला, मुलगा राजीव, सून सोनाली, नात जान्वही असे राहत होते. 

राजीव बहिरट हे थरमॅक्स कंपनीत नोकरीस होते तर, जान्हवी ही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. बहिरट कुटुंबीय दरवर्षी आपल्या नातेवाईकांसह पावसाळ्यामध्ये फिरायला जात असत. कधी देवदर्शनाला तर कधी निसर्गाच्या सान्निध्यात. यावर्षी त्यांच्या कुटुंबीयांनी लोणावळ्याला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार बहिरट कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक असे सर्व जण सहा वाहनांनमधून शनिवारी लोणावळ्याला आहे. मौजमजेनंतर हे सर्व जण रविवारी जो आपआपल्या ठिकाणी परतू लागला. राजीव बहिरट यांच्या कारमध्ये वडील चंद्रशेखर, पत्नी सोनाली, मुलगी जान्हवी होते तर त्यांची आई नातेवाईकांच्या गाडीतून येत होत्या.

रविवारी दुपारच्या सुमारास बहिरट कुटुंबीय नातेवाईकांसह पुण्याशा दिशेने येऊ लागले. राजीव यांची कार सर्वात पुढे होती. कार्ला फाट्यानजीक  त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. पाठीमागून येणार्‍या नातेवाईकांना राजीव यांच्या कारचा अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाहन थांबवून मदतीसाठी प्रयत्न सुरू केले परंतु, तोपर्यंत  उशीर झाला होता.  घटनास्थळाचे विदारक चित्र पाहून आई प्रमिला यांनी हंबरडा फोडला. अपघाताचे वृत्त मुंढवा येथील कलाशंकरनगरमध्ये समजताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी रात्री उशिरा गर्दी केली होती.