Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Pune › पुण्यात गुंडांच्या हल्‍ल्यात बिल्‍डर शहांचा मृत्यू

पुण्यात गुंडांच्या हल्‍ल्यात बिल्‍डर शहांचा मृत्यू

Published On: Jan 15 2018 7:25AM | Last Updated: Jan 15 2018 7:25AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

घरातून बाहेर बोलवत दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या नामांकित बिल्डर देवेनभाई जयसुखलाल शहा (55, रा. फ्लॅट नं.4, सायली अपा., लेन. नं.7, प्रभात रोड, डेक्कन) यांचा शनिवारी मध्यरात्री  उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिस तपास करत आहेत.  व्यावसायिक वादातूनच हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  याप्रकरणी त्यांचा मुलगा अतित शहा (29) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डेक्कन पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. देवेनभाई शहा यांच्या पत्नी आशा यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे शहा कुटुंबीय त्यांच्या दोन चारचाकी वाहनांमधून बाणेर रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. 

त्या ठिकाणी त्यांनी जेवण केले व ते रात्री पावणेअकरा वाजता घरी आले. शहा त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरात गप्पा मारत बसले. त्याच वेळी त्याचवेळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे दुचाकीवर दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला बोलविण्यास सांगितले. त्याने देवेनभाई शहा यांच्याकडे जाऊन दोन व्यक्ती आल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि ते खाली आले. देवेनभाई शहा खाली येताच हल्लेखोरांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी देवेनभाई शहा यांनी आपण बसून बोलू, असे सांगितले. त्यावेळी  दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या जवळील पिस्तूलातून पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या शहा यांना लागल्या होत्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत तर, दोन गोळ्या कमरेजवळ लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु ते यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाच गोळ्यांपैकी दोन गोळ्या मिस फायर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी शोध घेऊनही हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नाही.

घटना ‘सीसीटीव्ही’त कैद
देवेनभाई शहा यांच्यावर झालेला हल्ला तेथील ‘सीसीटीव्ही’त कैद झाला असून, यात हल्लेखोरांचे चेहरे दिसत आहेत. शहा कुटुंबीय जेवण्यासाठी गेलेल्या हॉटेलमध्ये अनोळखी व्यक्ती त्यांच्या जेवणाच्या टेबलच्या पाठीमागील टेबलवर काही वेळ बसली होती. त्याने केवळ हॉटेलमधील मेनूकार्ड चाळले व काही क्षणातच निघून गेेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शहा यांचा पाठलाग करून हा हल्ला करण्यात आला असावा, असा संशय आहे. पल्सरवरून आलेले गोळ्या झाडणारे दोन हल्लेखोर व त्यांच्या बरोबर आणखी दोघे असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आरोपींची नावे निष्पन्न 
देवेनभाई शहा यांच्या खूनप्रकरणी पोलिसांची सहा पथके तपास करत आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले आहे. त्यामध्ये हल्लेखोरांचे चेहरे दिसत आहेत.  त्याआधारे वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून पोलिसांची सहा पथके तपास करत आहेत. सध्या तरी खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती झोन एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. दरम्यान, एटीएसच्या एका कर्मचार्‍याने या घटनेतील हल्लेखोरांनो ओळखले असून त्याअनुषंगानेही एक पथक तपास करत असल्याचे समजते.