Wed, Jan 16, 2019 13:43होमपेज › Pune › एटीएमचा सुरक्षारक्षक जपतोय रेखाचित्राचा छंद

एटीएमचा सुरक्षारक्षक जपतोय रेखाचित्राचा छंद

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:34PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

तुम्ही जर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मोरवाडी चौकातून जात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ नक्की थांबा. तुम्हाला तिथे 65 वर्षाचे काका एटीएमच्या बाहेर पेन्सीलने कागदावर रेषा मारत बसलेली दिसतील. मोरवाडी चौकातील एटीएमचे सुरक्षा रक्षक असलेले रावसाहेब चक्रनारायण नोकरी करत स्वतःचा छंद जपत आहेत. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांची कला पाहून त्यांचे कौतूक करतो.

रावसाहेब चक्रनारायण हे मुळचे नेवासे गावचे. नोकरीनिमित्त शहरात आले. भोसरीतील एका कंपनीमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर रिकाम्या हाताला काम पाहिजे आणि घर चालवण्यासाठी नोकरी पाहिजे म्हणून सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली. एटीएमच्या बाहेर ड्यूटी करताना बारा तास एकाच जागेवर बसून राहवे लागते. त्यामुळे त्यांनी तरूण वयातील छंद पुर्ण करण्याचे ठरवले. आणि येथून सुरू झाला त्यांचा रेखाचित्राचा प्रवास. कुठलेही तंत्रशुद्ध शिक्षण न घेता अगदी सुरेख असे रेखाचित्र चक्रनारायण काढतात. एटीएममध्ये येणारे अनेक नागरिक त्यांच्याकडून स्वतःचे चित्र बनवून घेतात. काही नागरिक तर त्यांना चक्क बक्षिसी देखील देऊ करतात. राजकीय नेते मंडळी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींचे दैनिकांमधून छापून आलेले छायाचित्र पाहून ते चित्र काढतात. त्यांच्या जवळ असलेल्या कागदांच्या बंचमध्ये राज्यातील बहुतांशी राजकीय नेते मंडळीचे चित्रे मिळतात.

एटीएमच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी करताना छंद जोपसत असल्याची माहिती बँक अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा सत्कार देखील केल्याची माहिती चक्रनारायण यांनी दिली. सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ड्यूटी करणारे चक्रनारायण दिवसभरात एक किंवा दोन चित्रे काढतात. कधी एटीएमच्या बाहेर उन्हात बसून तर कधी एटीएम मधील एसीची हवा खात चक्रनारायण यांची चित्र काढण्याचे काम सुरू असते. काही वेळा अनेकांना पैसे काढण्यासंदर्भात किंवा पैसे टाकण्यात अडचणी येतात. त्यावेळी चक्रनारायण स्वतः तुम्हाला मदत हवी आहे का असे विचारून व्यवहार पुर्ण करण्यास मदत करतात. सर्वांशी हसून बोलणार्‍या या अवलियाची एटीएममध्ये येवून गेलेला प्रत्येकजण दखल घेत असल्याची माहिती आजूबाजूचे त्यांचे सहकारी सांगतात.