Mon, Apr 22, 2019 23:56होमपेज › Pune › थकित एफआरपीप्रश्‍नी सोलापुरातील दोन कारखान्यांवर जप्ती

थकित एफआरपीप्रश्‍नी सोलापुरातील दोन कारखान्यांवर जप्ती

Published On: Aug 04 2018 9:10PM | Last Updated: Aug 04 2018 9:10PMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या उसाच्या थकित एफआरपीप्रश्‍नी सोलापूर जिल्ह्यातील श्री सिध्देश्‍वर सहकारी आणि भिमा (टाकळी) सहकारी साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्राप्रमाणे (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिले आहेत. या दोन्ही कारखान्यांची मिळून 54 कोटी 11 लाख 75 हजार रुपये थकित एफआरपी ही विहित दराने होणार्‍या व्याजानुसार वसुल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

श्री सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये 7 लाख 45 हजार 754 मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. शेतकर्‍यांच्या उसाची निव्वळ एफआरपी प्रमाणे 41 कोटी 48 लाख 42 हजार रुपये थकित ठेवली आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील  टाकळी सिकंदर भिमा (टाकळी) सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 11 हजार 876 मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीचे 12 कोटी 63 लाख 33 हजार रुपये थकित ठेवले आहेत. त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी ऊस नियंत्रण 1966 मधील तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे.

याबाबत दोन्ही कारखान्यांना सुनावणी संधी देऊन म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यावेळी थकित एफआरपीची रक्कम देण्याचे कबुल केले होते व रक्कम भरण्याची लेखी हमी दिली होती. तथापि पुरेशी संधी देवूनही कारखान्यांनी थकित एफआरपी रक्कमेचा भरणा केलेला नसल्याने दोन्ही कारखान्यांवर जप्ती आदेश काढण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी थकित एफआरपीच्या रक्कमा जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने आणि उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीद्वारे विक्री करुन या रक्कमेतून शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकीची रक्कम खात्री करुन संबंधित शेतकर्‍यांना देण्यात यावी, असेही आदेशात पुढे म्हटले आहे.