पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर (70) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी सकाळी साडेआठ वाजता अखेरचा श्वास घेतला.
आजारपणामुळे गेल्या तीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून होते. प्रकृती जास्तच बिघडल्यानंतर त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. 10 फेब्रुवारी 2018 रोजी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची त्यांच्या केअरटेकरने हत्या केली होती.
कोल्हटकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचा मुलगा अन्वय हा अमेरिकेतून येणार असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. 5 मे रोजी वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिलीप कोल्हटकर त्यांच्या सासू, आशा सहस्रबुद्धे यांच्यासोबत पुण्यातील एरंडवणे भागातील गुळवणी महाराज पथ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहात होते. दिलीप कोल्हटकरांचे घरचे वातावरण सुरुवातीपासूनच कलेसाठी पोषक होते. त्यांचे वडील भालचंद्र कोल्हटकर हे उत्तम व्हायोलीनवादक होते. नाटककार बाळ कोल्हटकर हे त्यांचे काका, तर नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर हे त्यांचे चुलत चुलते होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, दिलीप कोल्हटकरांनी रंगमंचावर एन्ट्री घेतली. एक यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नाट्य क्षेत्रात; तसेच दिग्दर्शक म्हणून चित्रपट आणि छोटा पडदा अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमांमध्ये वावरताना आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला.
सुरुवातीस त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये तीस वर्षे नोकरी केली. मात्र, नाटकाशी नाळ जुळल्याने त्यांनी सेवानिवृत्ती घेत रंगदेवतेची सेवा करणे पसंत केले. पं. सत्यदेव दुबे आणि विजया मेहतांकडे प्रत्येकी पाच वर्षे, तर पुण्याचे राजा नातू आणि भालबा केळकरांकडे प्रत्येकी दोन वर्षे त्यांनी नाट्यकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर, बहुरूपी, एन.सी.पी.ए. नेहरू सेंटर आणि पृथ्वी थिएटरसाठीही प्रत्येकी एका नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले. बँक ऑफ बडोदासाठी त्यांनी सतरा एकांकिका दिग्दर्शित केल्या. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
त्यातल्या विसाहून अधिक नाटकांचे शंभराहून अधिक प्रयोग झाले. सुयोग निर्मित मोरूची मावशी या नाटकाचे दोन हजाराहून अधिक प्रयोग झाले. यासह आई रिटायर होते, उघडले स्वर्गाचे दार, सोनचाफा, दीपस्तंभ, छावा, आसू आणि हसू, गोडी गुलाबी आणि मकरंद राजाध्यक्ष, गोष्ट जन्मांतरीची अशा एकापेक्षा एक सरस नाटकांचे 8 हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याशिवाय, शेजारी शेजारी, ताईच्या बांगड्या या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केले आहे.
Tags : senior director dilip kolhatkar passed away in pune