Wed, Jul 24, 2019 07:50



होमपेज › Pune › ‘सेल्फी विथ खड्डा’ काढा आणि मिळवा 100 रुपये

‘सेल्फी विथ खड्डा’ काढा आणि मिळवा 100 रुपये

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:02AM



पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागात रस्त्यांवर लाखो खड्डे पडले आहेत; मात्र पालिका प्रशासन 4 हजार खड्डे पडल्याची खोटी आकडेवारी देत आहे. पालिका प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी नागरिकांकडून शहरातील खड्ड्यांची छायाचित्रे मागविली आहेत. प्रत्येक छायाचित्रास 100 रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि. 17) दिली. पालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचा दावा केला होता; मात्र जोरदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारयुक्त कारभारातून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविले जात असून, त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप साने यांनी केला. सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाचा त्यांनी निषेध केला आहे. 

महापौरांनी प्रशासनाला दोन दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे सक्त आदेश दिले होते; परंतु प्रशासनाने महापौरांच्या आदेशाला हरताळ फासला आहे. आजअखेर  खड्डे बुजविले गेले नाहीत. त्यावरून प्रशासन किती निगरगट्ट आहे हेच सिद्ध होत आहे. शहरात केवळ 4 हजार 59 खड्डे पडले असून, केवळ 684 खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे, असा दावा स्थापत्य विभागाने केला आहे; मात्र प्रत्यक्षात शहरात लाखो खड्डे आहेत. तरी सुध्दा प्रशासनने अशा प्रकारची उत्तरे म्हणजे शहरवासीयांच्या डोळ्यात धूळफेक आहे, असा आरोप साने यांनी केला. या आकडेवारीबाबत आपणास काही माहिती नसल्याबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरातील खड्ड्यांची प्रत्यक्ष आकडेवारी पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांना कळावी म्हणून ‘सेल्फी विथ खड्डा’ उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस राबवित आहे. छायाचित्र पाठविणार्‍यास 100 रुपये दिले जाणार आहेत; तसेच फेसबुक पेजला टॅग करावे. हे छायाचित्र 9822199599 किंवा 9970037513 या व्हॅाट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन साने यांनी केले आहे. या छायाचित्रांमुळे भाजप पदाधिकारी व प्रशासनाला जाग येऊन शहरातील रस्ते खड्डेमुुक्त होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हे छायाचित्र महापौर, आयुक्त व तिन्ही आमदारांना टॅग केले जाणार असल्याचेही साने यांनी सांगितले. 

मग दीड वर्षात भाजपने रस्तेच केले नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील रस्त्यावर खड्डे दुरुस्तीचे काम भाजप करीत आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. त्या वाक्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पवार यांचे अभिनंदन केले. त्यावरून गेल्या दीड वर्षांत भाजपने एकाही रस्त्याचे डांबरीकरण व विकासकामे केली नसल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. जवळच्या ठेकेदारांसाठी अधिकार्‍यांवर दोन्ही आमदार व पदाधिकार्‍यांकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आयुक्त हर्डीकर हे सुध्दा नागपूरहून ठेकेदार मागवित आहेत. त्या टक्केवारीत मुख्यमंत्रीही सामील असण्याची शक्यता असल्याची टीका त्यांनी केली.