पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्या चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23)झाले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा उधळून लावण्याच्या प्रयत्नांची चर्चा असल्याने चिंचवड गाव आणि परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एक प्रकारे चिंचवड परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
चिंचवड गावातील चापेकर वाड्याजवळ संग्रहालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाने पूजा करू न देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरला न जाता आपल्या घरूनच विठ्ठलाची पूजा करणे पसंत केले.
त्यानंतर चापेकर संग्रहालयाच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि विरोधकांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक महत्वाच्या चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस ठेवला होता. चौकाचौकात नागरिकांऐवजी पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यामुळे शहराला एका छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.या वेळी 3 उपायुक्त, 4 सहायक पोलिस आयुक्त, 24 पोलिस निरीक्षक, 36 अधिकारी, 500 कर्मचारी, 150 महिला कर्मचारी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.