Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Pune › विद्यार्थ्यांची वाहतूक  करणार्‍या रिक्षाचा अपघात(video)

विद्यार्थ्यांची वाहतूक  करणार्‍या रिक्षाचा अपघात(video)

Published On: Aug 28 2018 5:22PM | Last Updated: Aug 29 2018 1:24AMपिंपरी : प्रतिनिधी

मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या बॅरिकेड्सला धडकून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा पलटली.  अपघातात पाच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली, तर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. 

ग्रेसी लोहाळे (5, रा. पिंपरी) असे या अपघातातील जखमी चिमुरडीचे नाव आहे. भोसरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय मुलांची वाहतूक करणारी नेहमीची व्हॅन अचानक बंद पडल्याने आज रिक्षामध्ये मुलांना घेऊन येत असताना हा अपघात झाला. खडकी येथील सेंट जोसेफ या शाळेतील मुले यात  जखमी झाली आहेत.

मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्सचा अंदाज न आल्याने रिक्षा बॅरिकेड्सवर धडकून रस्त्यावर पलटली. यावेळी रिक्षातील मुले रस्त्यावर फेकली गेली. पाच वर्षाची ग्रेसी रिक्षाखाली अडकल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.