Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › जॉगिंग ट्रॅक ठरला चिमुकल्यासाठी काळ

जॉगिंग ट्रॅक ठरला चिमुकल्यासाठी काळ

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 1:05AMपुणे / वारजे : प्रतिनिधी 

सायकलवरून जाणार्‍या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी वारजे माळवाडी परिसरात घडली. 
पृथ्वीराज ऊर्फ अथर्व विशाल चव्हाण (12, रा. वारजे माळवाडी, साई कॉलनी, सर्व्हे नं.133) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांकडून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
पृथ्वीराज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. त्यास शारीरिक व्यायामासह स्पोर्टमधील फुटबॉल, क्रिकेट या खेळांची खूप आवड होती. दररोज नियमितपणे सकाळी साडेसहा दरम्यान वारजे आर. एम. डी. कॉलेजपर्यंत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील जॉगिंग ट्रॅकवर अथर्व सायकलिंगसाठी जात होता. शनिवारी (दि. 18) तो नेहमीप्रमाणे साडेसहा वाजेदरम्यान जॉगिंग ट्रॅकवर गेला होता.  यावेळी तो सायकलवर न जाता चालत गेला. काही वेळ व्यायाम तसेच खेळून तो शाळेत जाण्यासाठी घरी आला. त्यानंतर शाळेची वेळ 7:15 वाजेदरम्यान  असल्याने तो पुन्हा घरातून सायकल घेऊन मित्रासोबत एक राऊंड मारून येतो, असे आईला सांगून बाहेर पडला. तो त्या सर्व्हिस रस्त्यावरील जॉगिंग ट्रॅकवर गेला. 

त्याचा मित्र सायकल चालवत जॉगिंग ट्रॅकवरून  पुढे काही अंतरावर गेला.  त्याचे मागे पुढे चालत जाण्यासाठी तो जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या स्ट्रीट लाईट पोलला सायकल लावत असतानाच काही सेकंदातच त्याला विद्युत पोलच्या विजेचा धक्का लागला. त्यावेळी हलका पाऊस झालेला होता. त्यामुळे  ठिकाण ओलसर होते. तो पोलला चिकटून राहिला आणि मोठ्याने  रडत मला करंट लागला मला करंट लागला असे ओरडू लागला. त्यावेळी त्याच्या मित्राने हे चित्र पाहिले आणि तोही ओरडू लागला आणि  अथर्वच्या घरी सांगण्यासाठी धावत गेला. अथर्वचे आई आणि वडील घटनास्थळी धावत येईपर्यंत परिसरातील नागरिक तसेच परिसरातून जाणारे सह्याद्री कुस्ती संकुलातील विद्यार्थ्यांनी लाकडी दांडक्याने अथर्वला पोलपासून बाजूला काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तसेच त्यास शासकीय रुग्णालय हलविल्याचे सांगितले. 

...तर अथर्वचे प्राण वाचले असते 

अथर्वला विजेचा धक्का  लागलेल्या घटनेदिवशी सकाळच्या वेळी तासाभरापूर्वीच मॉर्निंग वॉक करणार्‍या दोन महिलांना हलकासा धक्का  लागल्याचा प्रकार घडला असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी थोडीशी जागरुकता दाखविली असती तर  कदाचित अथर्व या चिमुकल्या मुलाचा जीव वाचला असता.

मुळचे मुळशी तालुक्यातील चव्हाण कुटुंबीय वारजे माळवाडी परिसरातील साई कॉलनी येथे साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी भाडे तत्त्वावर राहण्यास आले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच चव्हाण परिवाराने राहत्या घराशेजारील घर खरेदी केले होते. आई, वडील व एक बहीण असलेला अथर्व हा घरातील एकुलता एक लाडका मुलगा होता.