Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Pune › सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याचे विद्यापीठाचे संकेत

सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याचे विद्यापीठाचे संकेत

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 12:39AMपुणे ः प्रतिनिधी 

सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील गैरकारभाराविरोधात संस्थेवर प्रशासक नेमा, प्राध्यापकांचे थकित वेतन द्या आदी मागण्यांसाठी संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरु केली आहेत. त्यामुळे विद्यार्थी हिताचा निर्णय घेत संस्थेद्वारे दिलेल्या मुदतीत विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्रश्‍न न सोडविल्यास येणार्‍या 28 फेब्रुव्रारीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातील विश्‍वसनिय सुत्रांनी दिली. 

सिंहगस एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाचा आज (26 फेब्रुवारी ) सातवा दिवस आहे. संस्थेद्वारे प्राध्यापकांचे गेल्या 16 महिन्याचे वेतन थकविण्यात आल्याने संस्थेच्या सर्व प्राध्यापकांनी 18 डिसेंबर पासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, संस्थेद्वारे आतापर्यंत गेल्यावर्षीच्या 2 महिन्याचे वेतन देण्यात आले असून अद्याप 14 महिन्याचे वेतन थकिवले आहे. मात्र, संस्थेवर कारवाई होत नसल्याने प्राध्यापक कर्मचार्‍यांनी 20 फेब्रुवारी पासून विद्यापीठात साखळी उपोषण सुरु केले आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाला संस्थेवर कारवाई करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये संबंधित संस्थेच्या महाविद्यालयांना असंलग्नीत करणे आणि संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस करणे. दरम्यान, संस्थेच्या महाविद्यालयांना असंलग्नीत केल्यास प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. 

सिंहगड संस्थेच्या प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाद्वारे त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी समितीद्वारे प्राध्यापक, विद्यार्थी आणि संस्थेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर संस्थेवर कडक कारवाई करण्याची शिफारस समितीद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार सिंहगड संस्थेला 27 फेब्रुवारी पर्यत तोडगा काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसात विद्यार्थी प्राध्यापकांचे प्रश्‍न न सोडविल्यास संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस कऱण्यात येणाचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले. दरम्यान, जोपर्यंत राज्य सरकार संस्थेवर धर्मादाय आयुक्तांद्वारे प्रशासक नेमत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे प्राध्यापक सचिन शिंदे यांनी सांगितले.