Fri, May 24, 2019 21:10होमपेज › Pune › मंत्र्यांचीच पीएचडी बोगस : सत्यपाल सिंह

मंत्र्यांचीच पीएचडी बोगस : सत्यपाल सिंह

Published On: Mar 02 2018 1:46PM | Last Updated: Mar 02 2018 1:38PMपुणे : प्रतिनिधी

'देशात पीएचडीचा लॉंगफॉर्म, विषयाची व्यवस्थित माहिती नसणाऱ्यांना पीएचडी मिळत आहे. अशाच प्रकारची पीएचडी विषयच होऊ शकत नसलेल्या एका विषयावर महाराष्ट्रातील एका मंत्र्याची झाली आहे,' असा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी केला.

याबाबत डॉ. सिंह यांना अधिक माहिती विचारल्यावर 'माझं नाव 'सत्य'पाल आहे', असे म्हणत मी जे बोलतो ते खरं असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे डॉ. सिंहांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याची पीएचडी बोगस आहे, या चर्चेला आता उधाण आले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग’ (एफसीएचएल)च्या शिक्षण संस्थेचे उद्घाटन करताना डॉ. सिंह बोलत होते.

‌डॉ. सिंह म्हणाले, 'पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असले पाहिजे, असे आताच्या परिस्थितीत नाही. पीएचडीची पदवी घेतलेले असे अनेक लोक पाहिले आहेत की, त्यांना पीएचडी शब्दाचा लॉंगफॉर्म माहिती नाही. पीएचडीच्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन ते बसले आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडे अशाच प्रकारची पीएचडी पदवी असून, तो महाराष्ट्रात मंत्री आहे. त्याचे नाव मी सांगणार नाही. त्याने पीएचडी घेतलेल्या विद्यापीठाचे नाव देखील सांगणार नाही. त्या मंत्र्याला मी विचारलं की, तुम्ही कोणत्या विषयात पीएचडी केली आहे. तेव्हा त्यांनी मला विषयाची माहिती दिली. मात्र, तो विषय सांगण्यालायक देखील नाही. त्यांनतर मी पीएचडीच्या विषयाला मान्यता देणाऱ्या आणि पीएचडीत उत्तीर्ण करणाऱ्या विभागप्रमुखाला याबाबत विचारले होते. तेव्हा ते म्हणाले,‘माझ्या हातात काही नव्हते. वरिष्ठ पातळीवरून मान्यता द्यायला माझ्यावर दबाव होता. मला दम भरला आणि धमकी दिली की, माझ्याकडे विषयाला मान्यता देण्याशिवाय आणि पीएचडीमध्ये उत्तीर्ण करण्याशिवाय पर्याय नव्हता.’ केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशात देखील असे प्रकार होत आहेत.'

या वेळी सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी कार्यवाह प्रा. आनंद भिडे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, एङ्गसीएचएलचे संचालक डॉ. सचिन खेडकर, डॉ. मोहन स्वामी, श्री. वेंकटेश्‍वरा विद्यापीठाचे कुलगुरु आहोल दामोधरम, पद्मावती महिला विद्यापीठाच्या प्रा. दुर्गा भवानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डार्विन आणि न्यूटन यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम...

डार्विन आणि न्यूटन या शास्त्रज्ञाच्या थेअरीवर घेतलेल्या आक्षेपाबाबत विचारणा केल्यावर डॉ. सिंह म्हणाले की, मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. मी देखील विज्ञानाचा विद्यार्थी आहे. विज्ञान हे विविध प्रकारच्या चर्चा आणि विरोधातून वाढते, असे मला वाटते. यापूर्वी असे विधान केवळ मी नाही, तर इतर अनेक लोकांनी केले आहे. मात्र, आता माझ्या विधानामुळे नास्तिक आणि आस्तिक लोकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये देखील भरपूर चर्चा झाली आहे. आता तर माझ्या विधानावर चर्चासत्रे देखील आयोजित करण्यात येत आहे. याबाबत मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छित असल्याचे देखील डॉ. सिंह यांनी सांगितले.