Sun, May 26, 2019 01:41होमपेज › Pune › निराधारांच्या उपचारांचा ससूनवर भार

निराधारांच्या उपचारांचा ससूनवर भार

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:21AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

बेवारस, अनोळखी, नातेवाईक नसलेल्या निराधार रुग्णांचा ससून रुग्णालयाच्या वैद्यकिय सेवेवर ताण येत आहे. सध्या येथील विविध वॉर्डमध्ये 15 ते 20 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी अथवा निराधारांचा सांभाळ करणार्‍या संस्थांमध्ये रुग्णालयाच्या वैद्यकिय समाजसेवा विभागामार्फत पाठविण्यात येते. 

अनेक रुग्णांना विशेषकरून वृध्दांना जवळचे नातेवाईक नसतात. काहींना नातेवाईक किंवा मुलगा-मुलगी असूनही त्यांना वार्‍यावर सोडून दिलेले असतात. काही रुग्ण मानसिकदृष्टया स्थिर नसल्यामुळे ते कुटूंबापासून दुर जातात. तर काही वेळा भिकारीही असतात. त्यांना अपघात, हृदयविकार किंवा इतर दुर्धर आजारांसाठी जर वैद्यकिय मदतीची गरज लागली तर त्यांना उपचारासाठी ससून या शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. बहुतांश रुग्णांना डायल 108 या मोफत सेवा देणार्‍याा रुग्णवाहिकेद्वारे आणले जाते.

येथे या रुग्णांवर सर्वसामान्य रुग्ण ज्या कक्षात उपचार घेतात त्याच कक्षात उपचार केले जातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड नाही आणि ते शक्यही नाही. कारण प्रत्येक आजाराच्या रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्ड वेगळा करणे शक्य नसते. या रुग्णांकडे कोणतेही कागदपत्रे नसली तरी त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यांची स्वतंत्र फाईल बनवून त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. यामध्ये जर रुग्ण 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल तर त्याच्यावर नियमानुसार मोफत उपचार होतात. पण, 60 वयाच्या आतील असेल तर त्यांच्या येणार्‍या बिलांचे पैसे येथील वैद्यकिय समाजसेवक विविध स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या मदतीद्वारे भागवतात.

इतकेच नव्हेत तर त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना जर त्यांचा राहता पत्ता आठवत असेल तर त्या पत्यावरही वैद्यकिय समाजसेवकांनी जमा केलेल्या निधीद्वारे सोडण्यात येते. जर पत्ता आठवत नसेल तर त्यांना शासनाच्या निराधार केंद्र, संस्थांमध्ये पाठवण्यात येते. तसेच 18 वर्षाच्या आतील बालक असेल तर त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने लहान बालकांच्या संस्थेत पाठवले जाते. आतापर्यंत वैद्यकिय समाजसेवा विभागाने शेकडो निराधार रुग्णांना त्यांच्या घरी तसेच संस्थेंमध्ये सोडलेले आहे.