होमपेज › Pune › तुकोबांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान

तुकोबांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 12:54AMपिंपरी : पूनम पाटील

शुक्रवारी आकुर्डी येथे विसावलेल्या संत तुकोबांच्या पालखीचे शनिवारी सकाळी पाच वाजता आकुर्डीतून पुण्याकडे प्रस्थान झाले. यावेळी आकुर्डी येथे सकाळी मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर मनोभावे दर्शन घेऊन वारकर्‍यांची दिंडी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

यावेळी पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती.  कपाळावर चंदन, गळ्यात तुळशीच्या माळा तसेच मुखी हरिनाम आणि मनात विठूरायाच्या दर्शनाची आस, असे उत्साहवर्धक वातावरण औद्योगिकनगरीत पाहायला मिळाले. डोक्यावर तुळशीवृंदावन, मुखी विठूमाउलीचे नाव घेऊन महिला वारकरी उत्साहात पंढरीच्या वारीला निघाल्या होत्या.

या वेळी हातात भगवे झेंडे, टाळमृदंगाचा गजर यामुळे सकाळी औद्योगिक नगरी विठूनामाने दुमदुमली होती. आकुर्डी येथून निघाल्यावर अल्पोपाहारासाठी एचए कॉलनी येथे काही काळासाठी विसावली. यावेळी विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने  वारकर्‍यांना अल्पोपाहार देण्यात आला. विविध कंपन्यांमधील कामगार वर्गाने या वेळी वारकर्‍यांची सेवा केली. या वेळी वारकर्‍यांना रेनकोट तसेच खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान आकुर्डीतून मार्गस्थ झाल्यानंतर दरम्यानच्या काळात रस्त्यावरही अनेकांनी वारकर्‍यांची सेवा करून ऋण फेडले. या वेळी विविध संस्था, संघटना तसेच भाविकांनी बिस्कीट पुडे, पाण्याच्या बाटल्या, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोट, साबूदाणा खिचडीचे वाटप केले. यावेळी निगडी ते फुगेवाडी वाहतूकमार्ग पालखीसाठी बंद ठेवण्यात आला होता. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, पालखीच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या आणि भक्तांचा उत्साह असे मंगलमय वातावरण शनिवारी शहरात पाहायला मिळाले.

मुस्लिम बांधवांकडूनही वारकर्‍यांची सेवा 

यंदाच्या वारीतही जातपात तसेच धर्माचे राजकारण विसरून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडले. कासारवाडी परिसरात मुस्लिम समाज बांधवांनी पालखीचे दर्शन घेतले व वारकर्‍यांना पाणीवाटप तसेच अन्नदान करून विठूमाउलीची सेवा केली. 

ब्राह्मण एकता मंचतर्फे साबणाचे वाटप

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पंढरपूरपर्यंत पायी जाणार्‍या वारकर्‍यांना ब्राह्मण एकता मंचच्या वतीने अंघोळीच्या साबणाचे वाटप करण्यात आले. वारकर्‍यांच्या स्वच्छतेसाठी व स्वच्छ भारत अभियानासाठी खारीचा वाटा म्हणून साबणाचे वाटप करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी प्रशांत कुळकर्णी, सुषमा वैद्य, संजीवनी पांडे, उपेंद्र जपे उपस्थित होते.