Fri, Jul 19, 2019 07:21होमपेज › Pune › पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा मृत्यू

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा मृत्यू

Published On: Jul 08 2018 12:23PM | Last Updated: Jul 08 2018 12:24PMपुणे : पुढारी ऑनलाईन

गेल्या आठ वर्षांपासून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा बजावणाऱ्या हिरा या अश्वाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर आज सकाळी ७ च्या सुमारास त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्याचे वय बारा ते तेरा वर्षाचे होते.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हिरा हा अश्व गेली आठ वर्षे चालत होता. पालखी प्रस्थान दिवशी तो श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली जि बेळगांव या गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या  वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. काल रात्री माऊलीचा सोहळा पुण्यात दाखल झाला. आज रविवारी सकाळी ७ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

पालखीच्या पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या अश्वाची सोय करण्यात आली आहे. राजा नावाचा अश्व माऊलींच्या सेवेसाठी आजापासून वारीत दाखल होणार आहे.

पालखी सोहळ्यात अश्वाची परंपरा

पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य सप्तमीला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.