Tue, Mar 26, 2019 02:17होमपेज › Pune › कोरेगाव भीमा भागात जमावबंदी

कोरेगाव भीमा भागात जमावबंदी

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:44AM

बुकमार्क करा
सणसवाडी/शिक्रापूर : वार्ताहर

 कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे फाटा येथे जमावबंदी जारी करण्यात आली आहे. मंगळवारी  कोरेगाव भीमा, शिरूर आणि कोंढापुरी येथे नागरिकांनी रास्ता रोको केला.  एक टपरी जाळण्यात आली. किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता अनुचित प्रकार घडला नाही. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शांततेचे आवाहन केले. दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेच्या निषेधार्थ बुधवार, दि. 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. 

सणसवाडी येथे केसरकर व विश्‍वास नांगरे पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. दगडफेकीत मृत्यू पडलेल्या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सणसवाडी येथे मृत्यू पावलेल्या राहुल बाबाजी फटांगडे (30, रा. सणसवाडी) याच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी कान्हूर मसाई (ता. शिरूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 कोरेगाव भीमा येथे 16 चारचाकी वाहने, दुधाचे टेम्पो यांचे नुकसान झाले. सणसवाडीत बारा दुकानांची तोडफोड, जाळपोळ झाली. दोन ट्रकसह वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाली. मंगळवारी  कोरेगाव भीमा, सणसवाडी बंद होते. दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद होते. केसरकर म्हणाले, लाखोंचा जमाव हाताळणे अवघड असते. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण लक्ष या घटनेवर आहे. यामध्ये जखमी झालेल्यांनाही शासन मदत देईल. अनेक गरिबांना याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणून विमा नसतानाही पोलिस व महसूल खात्याकडून पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल.

आज महाराष्ट्र बंदची हाक

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही घटना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कोणालाही त्रास होणार नाही, बंद शांततेत पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असल्याचे पाहून अ‍ॅड. आंबेडकर यांनी मुंबईत तातडीने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून घेत असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केले.बंदमध्ये संभाजी ब्रिगेडसोबत महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी आणि जातीमुक्ती आंदोलन सहभागी होणार आहेत. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करू नये.

आम्ही कोणाला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असे करू नये. हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मनोहर  ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि काही स्थानिक नेते हे या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनी हे सगळे कटकारस्थान रचले आहे. तसेच पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.