Mon, Jul 22, 2019 02:37होमपेज › Pune › ...म्हणे पुण्यातील नद्यांचे आरोग्य सुधारले!

...म्हणे पुण्यातील नद्यांचे आरोग्य सुधारले!

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:27AMपुणे : अपर्णा बडे

गटारगंगा बनलेल्या मुळा-मुठेमधील पाणवनस्पती आणि जलचर नष्ट झाले असताना या नद्यांचे आरोग्य सुधारले असल्याचा जावईशोध महापालिकेने लावला आहे. शहरातील नदी आणि तलावांतील पाण्यांमध्ये जीवसृष्टीसाठी आवश्यक प्राणवायूची स्थिती चांगली असल्याची नोंद पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार, पुण्यातील कात्रज आणि पाषाण तलावात सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली ऑक्सिजनची पातळी 2016 पेक्षा 2017 मध्ये कमी झाल्याचे सांगितले आहे. तर मुठा नदी वाहते अशा विठ्ठलवाडी, म्हात्रे पूल, एरंडवणे, जोशी पूल, ओंकारेश्‍वर, रेल्वे पूल येथे ऑक्सिजनची पातळी वाढल्याचे नमूद केले आहे. नाल्यात सांडपाण्याचे प्रमाण अधिक झाल्याने विरघळलेल्या प्राणवायुचे प्रमाण कमी झाल्याचे दाखविण्यात आले आहे. 

शहरात जेथून नदी वाहते अशा विठ्ठलवाडी, म्हात्रे पूल, रेल्वे पूल येथे ‘सीओडी’चे (केमिकल ऑक्सिजन डिमांड) अर्थात रासायनिक प्रदूषकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. हेच प्रमाण कात्रज तलावात घटलेले असून, पाषाण तलावात ‘अंशत:’ वाढले आहे, तर नागझरी व भैरोबा नाल्यात हे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी असून, केवळ आंबिल ओढ्यात वाढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. 

गतवर्षीपेक्षा यंदा मुठा नदीत जैविक प्रदूषकांचे (बीओडी) प्रमाण केंद्रीय प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेल्या 30 मिलिग्रॅम प्रतिलिटर या पातळीपेक्षा जास्त आहे. यातूनच या भागात 
‘बीओडी’चे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होते. रेल्वे पुलाजवळ नदी सर्वाधिक प्रदूषित झालेली आढळून आली आहे. पर्यावरण अहवालात नाल्याच्या प्रदूषणाबाबत विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाणही केवळ काही प्रमाणात वाढल्याचे सांगितले आहे.

नदीचे स्वररूप अहवालात छान; मात्र वास्तव भीषण

प्रदूषणामुळे मुठा-मुळा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. शहरातून वाहणार्‍या नदीचा रंग शेवाळामुळे  बदलला आहे. या नद्या मैलापाणी आणि सांडपाण्यामुळेच प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरात काही प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजाराचे प्रमाणही वाढत आहेत.