Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Pune › पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रिपाइं शहराध्यक्षाची हत्‍या 

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रिपाइं शहराध्यक्षाची हत्‍या 

Published On: Feb 12 2019 9:56AM | Last Updated: Feb 12 2019 9:56AM
पुणे : प्रतिनिधी

बारा दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या आरपीआय शहर अध्यक्ष आणी आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पौड भागातील दरीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. विनायक सुधाकर सिरसट (वय 32, रा. वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विनायक याचे वडील सुधाकर सिरसट (वय 52) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तत्पूर्वी, पोलिसांच्या तपासातील दिरंगाईमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय (ए) व रिपब्लीकन बांधकाम सेनेच्या वतीने सोमवारीच जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालयाजवळ आंदोलनही करण्यात आले होते. यावेळी त्यांना तपासाचे आश्‍वासन दिले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसट कुटूंब शिवण्यात राहण्यास आहे. सुधाकर सिरसट हे रिपब्लिकन बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. तर, विनायक हा शहर अध्यक्ष होता. तो फ्लॅटचे पीओपी करण्याचे काम करत होता. विनायक हा 30 जानेवारी रोजी कामावर जातो, असे सांगून पजेरो कार घेऊन घराबाहेर पडला होता. यानंतर फिर्यादींचा चालक विश्‍वास शहाणे यांनी त्यांना फोन करून विनायक यांनी तातडीने 15 लाख रूपये घेऊन येण्याचे सांगितल्याची माहिती दिली. यावेळी फिर्यादींनी मुलगा विनायक याला फोन केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता. विनायक याच्या जवळच्या मित्रालाही फोन केला. परंतु, त्याचाही फोन बंद होता. यामुळे दोघे घरी येतील, याची वाट पाहत होते. मात्र, दोघेही रात्री घरी परतले नाहीत. यामुळे दुसर्‍या दिवशी (31 जानेवारी) फिर्यादी हे विनायक याच्या काम सुरू असणार्‍या तळेगाव येथील साईटवर गेले. परंतु, त्याठिकाणीही विनायक मिळून आला नाही. यामुळे विनायकचा शोध घेण्यास सुरूवात केली.

जांभूळवाडी रोडवरील आंबेगाव खुर्द भागात विनायक याची पजेरो कार आढळली. यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे विनायक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर भारती विद्यापीठ पोलिस याप्रकरणाचा तपास करत होते. विनायक याचे मोबाईलचे लोकेशन तसेच माहिती गोळा करण्यात येत होती. यादरम्यान, त्याचे लोकेशन लवासा रोडवरील मुठा गावच्या परिसरात आले होते. त्यानुसार, पोलिसांनी या भागात विनायक याचा शोध घेतला. त्यावेळी येथील दरीत त्‍याचा मृतदेह आढळून आला. विनायक याच्या नातेवाईकांना मृतदेह दाखविण्यात आला, त्यावेळी तो विनायक याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विनायकची ओळख पटली आहे. 

विनायकला धमक्या देण्यात आल्या होत्या

सुधाकर सिरसट तसेच विनायक हे रिपब्लिकन पक्षाचे काम करत होते. यादरम्यान, ते आंबेगाव, उत्तमनगर, कोंढवे-धावडे तसेच परिसरातील बेकायदेशीर बांधकामाबाबत आवाज उठवत होते. तसेच, काही बांधकामांबाबत पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यावरून या बांधकाम साईटवर कारवायाही झाल्या आहेत. यामुळे संबंधितांकडून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे सुधाकर सिरसाट यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. तक्राती त्‍यांनी काही लोकांची नावेही दिली होती. बारा दिवसांच्या तपासात पोलिसांना विनायकचा शोध लागला नाही. त्‍यामुळे पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने सोमवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. 
 

अधिक वाचा : दुप्पट गर्दीचे आव्हान रामदास आठवलेंना पेलवले नाही

अधिक वाचा : पुण्याची जागा काँग्रेसकडेच : अजित पवार