Tue, Jun 18, 2019 21:07होमपेज › Pune › पुणे  : अवघ्या ३० दिवसांत ७४ घरे फोडली

पुणे  : अवघ्या ३० दिवसांत ७४ घरे फोडली

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपुणे  : प्रतिनिधी

पुणेकरांनी दिवस-रात्र घाम घाळून गोळा केलेल्या पै-पै पैशांवर चोरटे डल्ला मारत असून गेल्या काही महिन्यांपासून शहरातील घरफोड्यांचा हैदोस काही केल्या थांबत नाहीत. शहरात केवळ 30 दिवसांमध्ये तब्बल 74 घरे फोडत लाखो रुपयांचा ऐवज अलगद लंपास केला आहे.  गतवर्षात सुरू असणारा हा चोरट्यांचा धुमाकूळ यंदाही कायम असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे ऐवज घेऊन पसार होत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयग्रस्त आहेत. 

पुणेकरांच्या समस्या अनेक आहेत. त्यात जीवनजगरहाटीत व्यस्त असणार्‍या नागरिकांची  झोप चोरट्यांनी उडवली आहे. गेल्या वर्षातला घरे फोडण्याचा ‘सिलसिला’ यंदाही कायम आहे. विशेष म्हणजे,  मध्यरात्रीबरोबरच  काही वेळांसाठी घराला कुलूप लावून कुटुंब बाहेर पडल्याचे पाहून भरदिवसाही चोरटे लाखोंचा माल पळवत आहेत. कमी वर्दळीचे ठिकाण सोडा...गर्दीच्या ठिकाणीही चोरटे बिनदास्त येतात आणि हात साफ करून जातात,  अशी चिंताजनक परिस्थिती शहरात काही घटनांवरून दिसत आहे.  चारचाकी वाहनांमध्ये टोळक्याने येतात. घातक हत्यारांचा धाक दाखवून ऐवज लंपास करण्याची पद्धतीही चोरटे अवलंबत आहेत. 

पुणे पोलिसांकडून चोरट्यांना आवर घालण्यासाठी पेट्रोलिंगबरोबरच गस्त वाढविण्यात आली आहे.परंतु, त्याचा तितकासा उपयोग झाल्याचे एकदिवसाआड सुरू असलेल्या घरफोड्यांवरून स्पष्ट होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे  घराला कुलूप लावून बाहेर पडले तरी नागरिकांच्या मनात धाकधूक असते. सोमवारी घरफोडीच्या चार घटना घडल्या. याचा तपास लागत नाहीत तोच मंगळवारीही मुख्य बाजार पेठेतील लक्ष्मी रस्त्यावर कपड्यांच्या दुकानांसह चार ठिकाणी घरे फोडली आहेत. अनेक घटनांमध्ये चोरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. परंतु, पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकर या घरफोड्यांच्या धुमाकुळाने हैराण झाले आहेत.  चोरट्यांना पकडण्यात यश मिळत नसल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची कळकळीची विनंतीही नागरिकांकडून पोलिसांना केली जाते. घरफोड्यांबरोबरच शहरात सोनसाखळी आणि लुटमारीच्या घटना वाढत आहेत.   दोन गटांमध्ये आठ दिवसाला वाद होतात आणि सामान्यांच्या  वाहनांची तोडफोड होते. शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा वावर वाढलेला असताना असताना पोलिस नेमके करतात काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.