Thu, Nov 22, 2018 01:29



होमपेज › Pune › धोका वाढतो आहे!

धोका वाढतो आहे!

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:01AM



पुणे :  प्रतिनिधी

स्वाईन फ्लूने ऑगस्ट महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक महिला उस्मानाबाद, दुसरी हडपसर तर तिसरी शिवाजीनगर येथील राहणार्‍या होत्या. सध्या 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत्यू झालेल्या महिलांपैकी तिघींनाही उपचारादरम्यान न्युमोनिया झाला होता, तर देाघींचे अवयव निकामी झाले होते. 

मूळ येवती, उस्मानाबाद येथील 36 वर्षीय महिलेचा 3 ऑगस्टला शहरातील पुणे स्टेशन जवळील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरवातीला तिला सोलापुर येथील रुग्णालयात दाखल केले असता, 22 जुलै रोजी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले होते. नंतर या महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाईन फ्लूसह न्युमोनिया, सेप्टीसेमिया आणि विविध अवयव निकामी झाल्याने 3 ऑगस्टला रात्री एक वाजता मृत्यू झाला. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे राहणार्‍या एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू  19 ऑगस्टला सकाळी कर्वे रोडवरील खासगी रुग्णालयात झाला.

तिला 18 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. या महिलेला आधीपासूनच मधुमेह, उच्च रक्‍तदाब हा त्रास होता. तसेच तिची हृदयाची शस्त्रक्रियाही झाली होती. अठरा ऑगस्ट रोजी सकाळी तीव्र श्‍वसनविकार, स्वाईन फ्लू, न्युमोनिया आणि विविध अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. हडपसर येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 21 ऑगस्ट रोजी एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात झाला. या महिलेला पुर्वीचा कोणताही आजार नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तिला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. स्वाइन फ्लूसह तीव्र श्‍वसनविकार, न्युमोनिया, सेप्सिस यामुळे तिचा मृत्यू  झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अकार रुग्ण व्हेंटिलेटरवर

शहरात सध्या विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 15 रुग्ण उपचार घेत अहेत. त्यातील 11 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वर्षी आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या संशयावरुन 5 लाख 61 हजार 817 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 5 हजार 374 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. त्यातील आठशे रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची तपासणी करण्यात आली असून, यातील 36 रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. तर बुधवारी 3 हजार 258 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 34 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. तर, 5 जणांच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील 4 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
 
पिंपरीत चार पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज एक तरी संशयित रुग्ण सापडतो आहे. गुरुवार आणखी चार स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले आहेत. शहरात स्वाईन फ्लूने सध्या 3 जणांचा बळी घेतला आहे. तर 105 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 28 पॉझिटिव्ह रुग्ण  आढळले आहेत.