Thu, Feb 21, 2019 19:16होमपेज › Pune › रिक्षाच्या बहाण्याने तरुणाला लुबाडले; एकाला अटक

रिक्षाच्या बहाण्याने तरुणाला लुबाडले; एकाला अटक

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:05AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पहाटेच्या सुमारास कसबा पेठेत रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला रिक्षा मिळवून देण्याच्या बहाण्याने अंधारात नेऊन कोयत्यानेे वार करून लुबाडणार्‍या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. तर, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. 

शुभम राजेश भोसले (21, फणी अळी, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी शुभम भुजबळ (22, टिळेकरनगर, कोंढवा) या तरुणाने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण बाहेरगावाहून शनिवारी सकाळी पुण्यात आला.  दरम्यान, तो बसमधून उतरल्यावर कसबा पेठेतील श्रीराम इंडस्ट्रीजजवळ शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्यांना रिक्षा मिळत नव्हती. त्या वेळी शुभम भोसले तेथे आला, त्याने फिर्यादी तरुणाला रिक्षा मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याला अंधारात नेऊन तेथे त्याच्या साथीदारांसह मिळून फिर्यादी तरुणाच्या हातावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्‍कम काढून घेतली. त्यानंतर पुन्हा त्याला कोयत्याचा धाक दाखवून कसबा पेठेतील अ‍ॅक्सीस एटीएममध्ये नेत एटीएममधून पाचशे रुपये काढण्यास लावले आणि एकूण 35 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज घेऊन तेथून पसार झाले. त्यानंतर तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शुभम भोसले याला अटक केली असून, इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.