Thu, Apr 25, 2019 18:11होमपेज › Pune › ‘आरटीओ’ची भूमिका रिक्षाचालकांच्या मुळावर

‘आरटीओ’ची भूमिका रिक्षाचालकांच्या मुळावर

Published On: Jan 23 2018 8:37AM | Last Updated: Jan 23 2018 8:37AMपुणे : नवनाथ शिंदे

प्रवाशांच्या सुरिक्षततेसाठी प्रत्येक रिक्षाचालकाला दरवर्षी रिक्षाचे पासिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, मोशी ट्रॅकवर रिक्षा पासिंगच्या नाड्या चक्क एजंटांच्या बुडाखाली असल्यामुळे सर्वसामान्य क्षाचालकांना
मनस्ताप सहन करावा लागत आहे. विनाएजंट रिक्षा पासिंगसाठी जाणार्‍या चालकाची रिक्षा किरकोळ कारणावरून नापास केली जात आहे, तर एजंटांना रिक्षा पासिंगसाठी 1 हजार रुपये द्या अन् अनफिट रिक्षा पास करून घ्या, असे चित्र आढळून येत आहे.

रिक्षाची फिटनेस तपासणी करताना लाईट, इंडिकेटर, वायफर, ब्रेक, रिव्हर्स गियर, दोन्ही आरसे, रिक्षामागे पाहण्यासाठी चौकोनी जागा, आगप्रतिबंधक यंत्र, सेफ्टी रॉड, हॉर्न, ऑनलाईन फी भरलेल्या  पावतीची तपासणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, एजंटमार्फत पासिंगला आलेली रिक्षा अनफिट असतानाही पास केली जात आहे. दरम्यान मोशी ट्रॅकवर दरदिवशी 40 पेक्षा अधिक रिक्षाचालकांना फिटनेसचा ग्रीन सिग्नल दिला जात आहे. त्यापैकी एकही रिक्षा अनफिट केली जात नसल्याचे वास्तव आहे. बहुतांश रिक्षा एजंटमार्फत तपासणीसाठी आल्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांकडून फक्त जुजबी तपासणी केली जात आहे. त्यासाठी 4 ते 5 जणांची एजंट टोळी मोटार वाहन निरीक्षकांच्या दिमतीला आहे. त्यापैकी एका जणाकडून रिक्षाची तपासणी करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जाते, तर दुसर्‍या एजंटाकडून कागदपत्रांवर साहेबांची सही घेतली जाते. तसेच एजंटांनी नेमलेल्या कर्मचार्‍याकडून रिक्षांच्या लाईटची तपासणी होत आहे. त्यामुळे रिक्षा फिटनेसच्या तपासणीबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. एक रिक्षा फिटनेस करून देण्यासाठी एजंटांकडून 1 हजार रुपये घेतले जात आहेत. त्यापैकी काही रक्कम संबंधित आरटीओ कर्मचार्‍याच्या खिशात जात असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी एजंटमार्फत पैसे दिल्यास विनासायास अनफिट रिक्षा पास केल्या जात असल्याचे चित्र आढळून आले आहे. त्यामुळे
रिक्षा पासिंगसाठी एजंटांचा बोलाबाला वाढल्याने सर्वसामान्य रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुसरीकडे संघटनांची दुकानदारी आरटीओ कर्मचार्‍यांवर दबाव टाकून रिक्षांचे पासिंग करवून घेत आहे. त्यामुळे एजंट आणि संघटना दलालांच्या भूमिकेत असल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय पासिंगचा मुहूर्त लाभत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले शहरात तब्बल 40 हजारांवर रिक्षा आहेत.

दरवर्षी रिक्षा पासिंग करताना चालकाला पावती फी 600 रुपये, तसेच एजंटाला किमान 1 हजार रुपये द्यावे लागत आहेत. दिवसेंदिवस पासिंगच्या जोखडात एजंटांची दुकानदारी आणि संघटनांची
दादागिरी वाढत आहे. त्यामुळे पारदर्शी रिक्षा पासिंगबद्दल आरटीओने दखल घेण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे