Thu, Jun 27, 2019 13:56होमपेज › Pune › पिंपरी शहरात रिक्षाचालकांची दादागिरी

पिंपरी शहरात रिक्षाचालकांची दादागिरी

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 11:53PMनेहरूनगर : बापू जगदाळे

पिंपरी चिंचवड ही एक उद्योगनगरी आहे. हजारो कामगार दररोज कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. कधी बसने तर कधी रिक्षाने प्रवास करत असतात. मात्र, शहरात रिक्षाचालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या केल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. शहरात नवीन पोलिस आयुक्तालय सुरू होऊनही रिक्षाचालकांच्या उर्मटपणाकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पटीने वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. त्यातच रिक्षाचालकांची दादागिरी वाढत असून याचा सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, नाशिक फाटा या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चौकांमध्ये तर रिक्षाचालकांची दहशत आहे. सिग्नल तोडणे, बसस्टॉपवर अतिक्रमण करणे, प्रवासी घेण्यासाठी एकमेकांत हुज्जत घालणे असे प्रकार चौकाचौकात पहायला मिळत आहेत. यामध्ये प्रवासी भरडला जात असून वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

नोकरदार वर्ग कामावर वेळेत पोहोचण्यासाठी रिक्षाचा वापर करत असतो. अशावेळेला काही रिक्षाचालक जास्त पैसे सांगून प्रवाशांना वेठीस धरतात. त्यांच्याबरोबर हुज्जत घालतात. अनेकदा हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत जातो. मात्र, रिक्षा संघटना कारवाईला विरोध करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये पोलिस आणि प्रवासी या दोघांनाही त्रास सहन करावा लागत असून खरे दोषी मात्र यातून अलगद सुटतात. यासाठी वाहतूक पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

रिक्षाचालकांमध्ये परप्रांतीयांचा भरणा

उद्योगनगरीत परप्रांतीय लोकांची संख्या मोठी आहे. ड्रायव्हिंग क्षेत्रात परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. विनापरवाना वाहन चालविणे, जास्त पैसे मिळविण्याच्या लोभापायी धोकादायक वाहतूक करणे, प्रवाशांची अडवणूक करणे, पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणे असे प्रकारही सध्या वाढू लागले आहेत. अनेकदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडले होते. संबंधित आरोपी पकडले गेल्यानंतर ते परप्रांतीय असल्याचे व ती एक मोठी टोळी असल्याचे उघड झाले होते. अशा बेकायदा पद्धतीने वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांची आणि त्यांच्या चालकांची तपासणी मोहीम सुरू करून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तरच वाहतुकीला शिस्त लागेल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल.

पोलिस यंत्रणा निष्क्रियच!

शहरात अनेक ठिकाणी बेकायदा रिक्षाथांबे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी वारंवार भांडणाचे प्रकार घडत असतात. अनेकांच्या रिक्षा जुन्या झालेल्या आहेत. तसेच वाहनाची कागदपत्रेही नसतात. रिक्षाचालकाकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसतो. कायद्याची भीती राहिली नसल्यामुळे काही रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांनादेखील हरताळ फासताना दिसतात. मात्र, तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नसून याबाबत पोलिस यंत्रणा निष्क्रिय बनली असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

रिक्षाचालकांना राजकीय वरदहस्त!

वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून रिक्षा चालविण्याच्या धंद्यात वाढ झाली आहे. नियमांचे उल्लंघन करून काही रिक्षाचालक धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करतात,  अशा चालकांवर कारवाई केली तर संघटना आडव्या येतात. मतांसाठी राजकीय नेतेमंडळी शहानिशा न करता पोलिसांनाच धारेवर धरतात. रिक्षाचालकांना राजकीय लोकांचा वरदहस्त लाभल्यामुळेच त्यांची दादागिरी वाढत आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी काम करतात की, दादागिरी करणार्‍या रिक्षाचालकांसाठी? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.