Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Pune › रोगाच्या प्रादुर्भावामुळे भात पीक संकटात

रोगाच्या प्रादुर्भावामुळे भात पीक संकटात

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 05 2018 11:59PMकामशेत : वार्ताहर 

मागील काही दिवसंपासून मावळातील भात पिकावर कडा करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भात पीक संकटात आल्याने कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना भात पिकावर फवारणी करण्याचे आव्हान करण्यात येत आहे; तसेच शेतकर्‍यांनी पिकावर त्वरित फवारणी करावी म्हणून औषधाच्या खर्चावर कृषी विभाग अनुदान देखील देणार आहे.

मावळातील माऊ, वाडेश्वर, नागाथली, वाह्नगाव, खांडी, सावळा, मालेगाव, किवळे, इंग्ळून, भोयरे, कशाळ, डाहुली इत्यादी आंदर मावळातील गावांमध्ये भातपिकाचा पाहणी  दौरा व भात पिकावर झालेला कीड रोग प्रादुर्भाव व कृषी विभागाने लावलेल्या फोरोमन ट्राप्स व ल्युअर्स याची पाहणी  करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, भातपीक शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडळ कृषी अधिकारी कुलकर्णी, कृषी सहाय्यक आर. पी. गायकवाड, बी. एस. पवार,  एन. एम. शिंदे आदी पाहणी दौर्‍यासाठी आंदर मावळात आले होते. 

यावेळी खांडी व कुसूर गावात कडा करपा रोगाचा भात पिकावर अतिप्रदुर्भाव झाल्याचे आढळून आले, तर इतर गावात जीवाणूजन्य करप्या  रोगाचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे . यामुळे रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकर्‍यांनी त्वरित औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आले. औषधांची फवारणी कशी करावी; तसेच खेकडा नियंत्रण कसे करावे याचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करून करण्यात आले.

मावळातील सर्व भात उत्पादक शेतकर्‍यांना भात पिकावरील फवारणीसाठी लागणार्‍या औषधांच्या किंमतीच्या 50 टक्के अनुदान कृषी विभाग देणार आहे, तर पिक प्रत्यक्षिके प्रकल्प राबविलेल्या सहा गावातील शेतकर्‍यांना 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .अनुदान मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी फवारणी केल्यानंतर औषधाची बिले कृषी सहाय्यकाकडे द्यायची आहेत. त्यानंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.