Thu, Apr 25, 2019 13:50होमपेज › Pune › वाकड- हिंजवडी पुलासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे

वाकड- हिंजवडी पुलासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:43AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हिंजवडी व वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. या कामासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शनिवारी (दि.12) भेट घेतली. या प्रकल्पासाठी सुमारे 300 कोटी खर्च असल्याने 50 टक्के खर्चाचा भार केंद्र सरकारने उचलावा, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. 

वाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल पालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. दरम्यान, गडकरी पुण्यात आलेले असताना आमदार जगताप, सत्तारूढ पक्षनेते पवार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पलिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना आमदार जगताप यांनी या उड्डाणपुल व इलिव्हेटेड मार्गाबाबत संपूर्ण माहिती दिली.

या पुलाचे संकल्प चित्रही तयार केले आहे. पुलासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात हा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे. एवढा मोठा खर्च करण्याची पालिकेची क्षमता नाही. शहरातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांनाही प्राधान्य द्यावे लागणार असल्यामुळे कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंतच्या शहरातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात यावा. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणामार्फत 50 टक्के रक्कम अदा करावी. तसेच, उर्वरित 25 टक्के  राज्य शासनाने एमआयडीसीमार्फत आणि 25 टक्के रक्कम पालिका तिजोरीतून खर्च केली जाईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले. या उड्डाणपुलामुळे हिंजवडीतील आयटी पार्कसह वाकड परिसरातील नित्याची होणारी वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.