Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Pune › ‘नालायक’ पोलिस झाले ‘लायक’!

‘नालायक’ पोलिस झाले ‘लायक’!

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:36AMपुणे : विजय मोरे 

शहर पोलिस दलातील 35 पोलिस निरीक्षकांचे गुन्हेगारांशी व अवैध धंदेवाल्यांशी संबंध असल्याचा पोलिस महासंचालकांना रिपोर्ट पाठवून थेट कारवाई करण्याबाबत आग्रह धरलेल्या पोलिस आयुक्तांनी, त्याच पोलिस निरीक्षकांना संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणी नेमले आहे. त्यामुळेच हे ‘नालायक’ ठरलेले अधिकारी ‘लायक’ कसे ठरले? याबाबत गौडबंगाल काय? या चर्चेने शहर पोलिस दलात जोर धरला आहे.

पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी 18 मे 2016 रोजी शहर पोलिस दलातील 35 पोलिस निरीक्षकांबाबत पोलिस महासंचालकांना गोपनीय अहवाल पाठविला होता. या बरोबर त्यांनी महासंचालकांशी प्रत्यक्ष चर्चाही केली होती. यामध्ये या निरीक्षकांचे शहरातील अवैध धंदेवाल्यांशी व गुन्हेगारांशी वैयक्तिक संबंध असल्याचा ठपका ठेवला होता. विशेष या सर्व अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्याही केल्या होत्या. या निरीक्षकांसोबत शहरात गुन्हेगारांसाठी बाहुबली समजल्या जाणार्‍या चौघा सहायक आयुक्तांचेही ‘कसुरी’ अहवाल पाठवले होते. त्यांच्यावरही निरीक्षकांवर ठेवण्यात आलेलेच आरोप केले होते. या अहवालाबाबत संपूर्ण राज्यातील पोलिस दलात खळबळ उडाली होती.

तडकाफडकी बदल्या झालेल्या या 35 पैकी 34 निरीक्षकांनी बदल्या रद्द करण्यासाठी मॅटकडे धाव घेतली होती. यापैकी एक निरीक्षक मॅटकडे गेला नव्हता. मॅट कोर्टानेही या बदल्यास स्थगिती दिल्याने हे सर्व अधिकारी पुन्हा पुणे शहरात हजर झाले. मात्र,  ‘नालायक’ ठरविलेले हे अधिकारीही पोलिस आयुक्त आपल्याशी कसे वर्तणूक करतील, याबाबत धास्तावले होते. तर दोन सहाय्यक पोलिस आयुक्त हे पोलिस आयुक्तांशी कसा पंगा घेतात, याबाबत तर पोलिस दलात चर्चेला ऊत आला होता. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारीची माहिती नसलेल्या अधिकार्‍यांना जवळ केले, असे शहर पोलिस अधिकारीच खासगीत बोलू लागले.

 तर गुन्हेगारी क्षेत्रात ज्या अधिकार्‍यांचा दबदबा होता, अशा बाहुबली अधिकार्‍यांना थेट दूर करण्याचे कारण काय? याबाबत चर्चा सुरु होती. पंरतु पोलिस आयुक्तांनी ज्या 34 अधिकार्‍यांना ‘नालायक’ ठरविले होते. त्यांच्यावर संशयास्पद सचोटी, लँडमाफियांशी हात मिळवणी, गँगस्टरना पाठिंबा व पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजात हस्तक्षेपाबरोबरच, अस्थिर मानसिकतेचे आरोप ठेवले होते. मात्र, हे ‘नालायक’ ठरविलेले 34 अधिकारी काही महिन्यातच पोलिस आयुक्तांचे अत्यंत जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्या अधिकार्‍यांवर अवैध धंदेवाले व लँडमाफियांशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवला. त्याच अधिकार्‍यांना अत्यंत मलईदार ठाणी बहाल करण्यात आली. काहींना तर संवेदनशील पोलिस ठाण्यांवर सन्मानपूर्वक बसविले गेले. हेच ‘नालायक’ ठरविलेले अधिकारी सद्य:स्थितीत आयुक्तांचे डावे-उजवे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. प्रत्यक्ष पोलिस महासंचालकांची भेट घेऊन ठपका ठेवण्यात आलेले अधिकारी ‘लायक’ कसे ठरले? त्या अधिकार्‍यांनी कोणती जादू केली? यामागे नेमके गौडबंगाल काय? याचीच चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
 

Tags : pune, pune news, police officer posting, illegal businessmen