Sat, Mar 23, 2019 02:16होमपेज › Pune › भाजपच्या बड्या पदाधिकार्‍यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करा

भाजपच्या बड्या पदाधिकार्‍यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करा

Published On: May 22 2018 5:50PM | Last Updated: May 22 2018 5:50PMपुणे : प्रतिनिधी 

सरकारी रुग्णालये, सरकारी महाविद्यालयांमध्ये नोकरी देण्याचे अमिष दाखवून तरूण तरूणींकडून लाखो रूपये घेऊन नोकरी न देता कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी भाजपच्या बड्या पदाधिकार्‍यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या बनावट नोकर्‍या देण्यासाठी ससून रूग्णालयात मुलखती घेण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. 

भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महामंत्री (अनुसुचित जाती-जमाती विभाग) जितेंद्र बंडू भोसले (वय 49), त्याची पत्नी स्मिता (वय 45, दोघेही, रा. उळवे, नवी मुंबई) यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत मधुकर पांडुरंग भाकरे (वय 49, रा. केज, जि. बीड) यांनी अ‍ॅड. सतीश कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 

वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयामध्ये शिपाई, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, दुरध्वनी चालक, इलेक्ट्रीशियन, वाहनचालक, भांडारपाल, वायरमन, पहारेकरी या जागा भरायच्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकांची ओळख आहे, असे सांगून अनेकांकडून नोकरीसाठी नियुक्तीपूर्व पैसे घेतले. त्यानंतर काही दिवसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील, ससून रुग्णालय येथे यादी प्रसिध्द केली. ती 68 जणांनी पाहिली. विशेष म्हणजे त्यानंतर त्या उमेदवारांना बोलावून त्यांची बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय येथे मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांकडून पैसे घेतले. रोख, धनादेश, आरटीजीएस आणि एनफटीद्वारे नागरिकांनी पैसे दिले आहेत. 

त्यानंतर आरोग्य विभागाच्या संचालकांची बनावट सही करून बनावट नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यावेळी सर्वजण पैसे परत मागू लागले. फिर्यादींनी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादींचे अपहरण करण्यात आले. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात तक्रार देऊनही पोलिसांनी राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अ‍ॅड. कांबळे यांनी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कादपत्रांच्या आधारे तक्रारदाराच्या बाजूने न्यायालयाने आदेश देताना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत. 

विविध आरोग्य विभागात नोकरीसाठी संचालकांच्या बनावट सहीचा उपयोग 

आरोपींनी आरोग्य विभागाच्या संचालकाची बनावट सही करून बनावट नियुक्ती पत्रे तयार केली. तसेच मुलाखती घेतल्या. यामध्ये 68 जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याबाबात नमूद करण्यात आले असून प्रत्येकाकडून लाखो रूपयांच्या रकमा उकळण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.