होमपेज › Pune › मत्सालयाच्या तिकीट दरात दहा पटीने वाढ

मत्सालयाच्या तिकीट दरात दहा पटीने वाढ

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:22AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

संभाजी उद्यानात असलेल्या मत्सालयातील विविध प्रजातींचे मासे पाहण्यासाठी प्रौढांसाठी 2 आणि लहान मुलांसाठी 1 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. या प्रवेश शुल्कामध्ये तब्बल दहा पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. 

शिवाजीनगर येथील संभाजी उद्यानात महापालिकेने 1953 पासून गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांचे मत्सालय सुरू केले आहे. हे मत्सालय संभाजी बागेमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक या भेट देऊन मासे पाहतात. शहराचे ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे असल्याने सहलीसाठी येणारे पर्यटकही या मत्सालयास भेटी देतात. शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या मत्सालयास मोठ्या प्रमाणात अभ्यासकही भेट देतात. त्यामुळे या मत्सालयाची नोंद वर्ल्ड अ‍ॅव्केरियम डिरेक्ट्रीमध्ये झाली आहे. 

हे मत्सालय सुरू झाल्यानंतर प्रौढांसाठी 1 रुपया आणि लहान मुलांसाठी 50 पैसे  प्रवेश शुल्क आकारले जात होते. या मत्सालयाचे जानेवारी ते मे 1994 या दरम्यान नुतनीकरण करण्यात आले. नुतनीकरणानंतर मत्सालयाचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी 2 आणि लहान मुलांसाठी 1 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा या मत्सालयाचे नुतनीकरण करण्यात आले. मत्सालयास भेट देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मत्सालयाची जागा अपुरी पडत आहे.

त्यामुळे या मत्सालयाचा विस्तार करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने मत्सालयाच्या मागील बाजूस आणि पोर्चमध्ये त्याचा विस्तार करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. हे काम प्रगतीपथावर असून दिवाळीपूर्वी पूर्ण करून दिवाळीमध्ये नारिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यामुळे सध्याचे 2 रुपये प्रवेश शुल्क दहा पटीने वाढवून 20 रुपये आणि लहान मुलांसाठी 1 रुपयावरून 10 रुपये करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.