Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Pune › मार्केटयार्डात दुधीला मागणी कायम; भाव स्थिर

मार्केटयार्डात दुधीला मागणी कायम; भाव स्थिर

Published On: Jun 22 2018 1:46PM | Last Updated: Jun 22 2018 1:46PMपुणे : प्रतिनिधी

दुधी भोपळ्याचा ज्यूस पिऊन महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात दुधीची आवक सुरळीत सुरू राहिली. दरम्यान, मागणीही कायम असल्याने भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.  शुक्रवारी ८ ते १० गाड्या म्हणजे जवळपास २० ते २२ टन दुधी विक्रीसाठी बाजारात दाखल झाला. घाऊक बाजारात त्याच्या प्रतिकिलोस ६ ते १२ रुपये तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये दर मिळाला.

दुधीचा ज्यूस पिऊन महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर दुधीच्या मागणी व दरामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवला नाही. इतर दिवसांच्या तुलनेत भाव व आवकही कायम राहिल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष व व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, पूर्वीच्या स्त्रिया या भाजी खरेदी तसेच चिरल्यानंतर चाखून पाहत होत्या. ती कडवट लागल्यानंतर त्या फेकून देत होत्या. मात्र, आता पुर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. मॉल अथवा बाजारातून भाजी खरेदी करून घरी गेल्यानंतर झटपट भाजी तयार करताना गृहिणी दिसून येतात. याखेरीज, मधुमेह, वजन कमी करणे, फिट राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या तसेच फळभाज्यांचा ज्यूस पिण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या सर्व गोष्टी करणे आवश्यक आहे. सध्यस्थितीत कारली सोडल्यास इतर कोणतीही फळभाजी कडवट अथवा वेगळ्या चवीची लागल्यास ती खाणे टाळावे. जेणेकरून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही. 

औषधी गुणधर्म असल्याने बहुतांश लोक भोपळ्याचा ज्युस पितात. भोपळा लागवडीसाठी इतर पिकांप्रमाणे खते तसेच किटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्याची विशेष अशी कोणतीही फवारणी करता येत नाही. दुधीला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गाकरून त्यावर विशेष खर्च करण्यात येत नाही. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल इफेक्टही नसल्याची माहिती दुधी उत्पादक शेतकरी विठ्ठल कांबळे यांनी दिली. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च तज्ञांनी २०११ साली दुधी भोपळ्याचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये असे आपल्या अहवालात नमूद केले होते. तसेच, कडू दुधीतील काही संयुगांमुळे मृत्यूही ओढवला जाऊ शकतो असेही यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे असेही भुजबळ यांनी सांगितले.