Sat, Feb 23, 2019 22:25होमपेज › Pune › बारामती : अकरा वर्षाच्या बालिकेला पळवून नेऊन बलात्कार

बारामती : अकरा वर्षाच्या बालिकेला पळवून नेऊन बलात्कार

Published On: May 27 2018 12:57PM | Last Updated: May 27 2018 12:57PMबारामती : प्रतिनिधी

अकरा वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे शनिवारी रात्री घडली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता पिडीत मुलगी वाणेवाडीच्या चौकात असताना एका तरुणाने तिला कशाचे तरी अमिष दाखवून मोटारसायकलवर बसविले. तेथून करंजेपुलाच्या बाजूला त्याने गाडी नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान रात्री उशीरा त्याने पुन्हा पिडीतेला वाणेवाडी चौकाजवळ निरा डावा कालव्यावरील पुलाजवळ आणून सोडत तो सुसाट वेगाने निघून गेला. करंजेपुल ते सोमेश्वर कारखाना परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकाने आहेत. स्थानिकांनी या दुकानातील सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु येताना आणि जातानाही त्याने सुसाट वेगाने दुचाकी नेली असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही फारसा उपयोग झाला नाही. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा मोठा जमाव घटनास्थळी जमला. आरोपीविरोधात कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी करंजेपुल पोलिस चौकीसमोर रविवारी मोठा जमाव जमला होता. 

दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी करंजेपूल चौकीला भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करत आहेत.