Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Pune › बलात्काराच्या कायद्यात महत्त्‍वपूर्ण बदल

बलात्काराच्या कायद्यात महत्त्‍वपूर्ण बदल

Published On: Jul 12 2018 11:52AM | Last Updated: Jul 12 2018 11:52AMपुणे : देवेंद्र जैन

भारत सरकारने बलात्‍काराच्या कायद्यात महत्त्‍वपूर्ण बदल केले आहेत. आता बलात्‍काराच्या घटनांत कठोर शिक्षा होण्याच्या दिशेने सरकारने कायद्यात काही बदल केले आहेत. १२ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्‍काराची घटना घडल्यास नव्या दुरुस्‍तीत मृत्यूपर्यंत जन्‍मठेप अथवा मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहेत. याबाबत राज्य सरकारने ९ जुलै रोजी आदेश काढला आहे. 

भारतीय दंड संहिता १८६०, भारतीय पुरावा कायदा १८७२, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ ( पोक्सो) मध्ये या सुधारणा केल्या आहेत. भारतीय दंड संहिता १८६० मध्ये यापुढे कलम ३७६ (१) ए मध्ये आता जास्तीत जास्त जन्मठेप (नैसर्गीक मृत्यू) दंडासह अशी तरतुद करण्यात आली आहे. तर कलम ३७६(२) आय वगळण्यात आले आहे. कलम ३७६ (३) नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहे. यानुसार यापुढे जो आरोपी १६ वर्षाखालील मुलीवर बलत्कार करेल त्याला दंडासह २० वर्षे तुरुंगवास किंवा नैसर्गीक मृत्यू होईपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येईल. 

नव्याने अंतर्भूत केलेल्या कलम ३७६ (ए बी) प्रमाणे जो आरोपी १२ वर्षा खालील मुलीवर बलत्कार करेल त्याला सुद्धा कमीतकमी २० वर्षे अथवा मृत्यूपर्यंत जन्‍मठेप दंडासह किंवा मृत्युदंड अशी शिक्षा भोगावी लागेल. यामध्ये कलम ३७६ (डी ए) हे सुद्धा नव्याने जोडण्यात आले आहे. त्यानुसार एक अथवा जास्त जणांकडून १६ वर्षा खालील मुलीवर बलत्कार झाल्यास त्यांना कमीतकमी दंडासह २० वर्षे किंवा मरेपर्यंत जन्‍मठेप अशी शिक्षा सुनावण्यात येईल. कलम ३७६ (डी बी) या नव्याने अंतर्भूत करण्यात आलेल्या कलमानुसार एक पेक्षा अधिक व्यक्तींनी १२ वर्षा खालील मुलीवर बलत्कार केल्यास त्यांना कमीतकमी दंडासह २० वर्षे तुरुंगवास, मरेपर्यंत जन्‍मठेप किंवा मृत्युदंड अशी शिक्षा देण्यात येईल.

भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार कलम १७३ (१ ए) मधील नवीन तरतुदीनुसार, यापुढे दाखल होणार्‍या सर्व लहान मुलांच्या बलत्काराच्या गुन्ह्यांचा तपास तीन ऐवजी दोन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.  तसेच यापुढे बलत्काराच्या अटक आरोपींच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी गुन्हा दाखल करणारा प्रथम तक्रारदार अथवा त्याने अधिकृत केलेली व्यक्ती यांनी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक असणार आहे. 

स्‍वागतार्ह निर्णय, काटेकोर अंमलबजावणी व्‍हावी : कायदे तज्ञ विजय सावंत

नवीन होऊ घातलेल्या सुधारणांबाबत ज्येष्ठ कायदे तज्ञ विजय सावंत यांनी पुढारी प्रतिनिला सांगीतले की, सरकारने बलत्काराच्या कायद्यामध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. ते स्वागातार्ह असून या गुन्ह्यांमध्ये  शिक्षेचे प्रमाण वाढल्यामुळे अपराध्यांना जरब बसणार आहे. आता या बदलांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच दोषारोपपत्र वेळेत भरल्यास खटले लवकर निकाली निघतील. त्यामुळे बलत्काराच्या घटनांना पायबंद बसू शकेल.