Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Pune › ‘माझा मुलगा मला परत द्या!’

‘माझा मुलगा मला परत द्या!’

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:34AM

बुकमार्क करा
रांजणगाव गणपती : वार्ताहर

सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत केली तरी आमच्या कुटुंबाची झालेली हानी भरून निघणार नाही. माझा मुलगा मला परत मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन आम्ही काय परिस्थितीत जगत आहोत ते पाहावे व माझा मुलगा मला परत द्यावा, असे भावनिक आवाहन सणसवाडी येथे 1 जानेवारी रोजी दंगलीमध्ये मृत पावलेल्या राहुल फटांगडे यांचे वडील बाबाजी धोंडीबा फटांगडे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना केले. 

चार दिवसांपूर्वी घटना होऊनही आमदार, खासदार व स्थानिक नेते मंडळी, मंत्री व सरकारी यंत्रणेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन आम्ही काय परिस्थितीत जगत आहोत हे पाहावे. आमच्या मुलाने अशी काय चूक केली होती की त्याची त्याला ही शिक्षा मिळाली. सरकारने माझ्या मुलाच्या मारेकर्‍यांचा शोध घेऊन योग्य ते शासन द्यावे, अशी मागणी मृत राहुल फटांगडे याचे वडील बाबाजी फटांगडे यांनी केली आहे. राहुलची आई जनाबाई या मात्र पुत्र वियोगाने पुर्णपणे खचल्या असून त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

 शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई गावच्या घोलपवाडी वस्तीवर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपर्क साधला असता त्यांनी हे भावनिक आवाहन केलेे. बाबाजी फटांगडे यांना जनाबाई फटांगडे व रंजना फटांगडे अशा दोन पत्नी आहेत. त्यातील जनाबाई फटांगडे यांना राहुल फटांगडे व विष्णू फटांगडे ही दोन मुले व पूनम रामदास दुर्गे ही एक मुलगी आहे. जनाबाई फटांगडे या आपल्या दोन मुलांसमवेत सणसवाडी येथे वास्तव्यास आहेत. यातील विष्णू बाबाजी फटांगडे हे पोलिस दलात कार्यरत आहेत. राहुल व त्याचे कुटुंब हे सण 2012 साली सणसवाडी येथेे स्थायिक झाले होते. राहुल याचा चंदननगर येथील दर्ग्यामध्ये दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय होता.  तो शांत व मनमिळावू होता. त्याने स्वतः कष्ट करून लहान भावाचे शिक्षण पूर्ण केले व घर बांधले होते. बाबाजी फटांगडे यांच्या दुसर्‍या पत्नीचे नाव रंजना फटांगडे असून त्या पती बाबाजी फटांगडे व दोन मुलांसमवेत घोलपवाडी येथे वास्तव्य करत आहे. यातील एक मुलगा खासगी कंपनीत कामाला जात आहे; तर दुसरा मुलगा हा स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करत आहे. 

एकदंरीत या फटांगडे कुटुंबावर राहुलच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाबाजी फटांगडे यांनी अतिशय काबाडकष्ट करून घोलपवाडी येथे पाण्याची टंचाई असल्याने टाकळी हाजी येथे वाट्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला आहे. बाबाजी फटांगडे यांच्याकडे तीन एकर जमीन असून, बहुतांश जमीन ही कोरडवाहू आहे. कारण या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने वर्षातील दोन ते तीन महिनेच शेतीला पाणीपुरवठा होतो. इतर वेळेस पिण्याच्या पाण्याचे हाल असतात. आजही विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून चालली आहेत. पैशाअभावी आपण ट्रान्सफॉर्मर आणू शकत नसल्याने जळत असलेली पिके पाहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे बाबाजी फटांगडे यांनी सांगितले.  त्यातच ही घटना घडल्याने शेताला पाणीसुद्धा  देता आले नाही. अशी दुर्दैवी परिस्थिती अचानक उद्भवली आहे.