Tue, Mar 19, 2019 15:53होमपेज › Pune › माता रमाईचे जीवन भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती

रमाईचे जीवन भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती

Published On: May 30 2018 12:21PM | Last Updated: May 30 2018 12:21PMपुणे : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या पत्नी रमाई यांचे योगदान खूप मोठे आहे. बाबासाहेबांच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, यासाठी रमाई यांनी शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. बाबासाहेब नावाच्या इमारतीचा पाया रमाई होत्या असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही. खऱ्या अर्थाने रमाई यांचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे बोलताना केले.

माता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी (दि. ३०) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री जलसंपदा व जलसंधारण विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, माता रमाई यांचा उत्तरप्रदेशात पुतळा आहे मात्र, तो पूर्णाकृती नाही. देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा हा पुण्यात साकारण्यात आला. रमाई यांच्या व्यक्तिमत्वाची उंची खूप मोठी आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या सदैव सोबत राहून त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहित केले. बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. त्यांना विश्वव्याख्यात करण्यात रामाईंचे मोठे योगदान आहे. ज्यावेळी बाबासाहेबांना कठीण परिस्थितीत कोणी साथ देत नव्हते, त्यावेळी रमाई यांनी बाबासाहेबांची केव्हाच साथ सोडली नाही. बाबासाहेबांनी भारतीय महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न केले. याचेच प्रतिबिंब बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात उमटले आहे. महिलांना संविधानाने भारतीय महिलांना समान अधिकार व हक्क दिले आहेत. बाबासाहेबांचा समावेश देश घडवणाऱ्या महापुरुषांमध्ये होतो. 

यावेळी केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, माता रामाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्याच हस्ते करण्याचा मनोदय जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि माता रमाई आंबेडकर स्मारक समितीचा होता. यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळाले. ३६ वर्षाच्या आयुष्यात रमाई यांनी बाबासाहेबांना दिलेली समर्थ साथ प्रेरणादायी आहे. राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, बाबासाहेबांच्या जीवनात रामाईंचे योगदान मोठे आहे. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते झाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक महापौर मुक्ता टिळक यांनी केले तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.

Tags : ramai life, Inspirational, Indian women, dr babasaheb ambedkar, president ramanath kovind, pune news