होमपेज › Pune › एफआरपी’साठी साखर आयुक्तालयाला घेराव घालणार : राजू शेट्टी(व्हिडिओ) 

एफआरपी’साठी साखर आयुक्तालयाला घेराव घालणार : राजू शेट्टी (व्हिडिओ)

Published On: Jun 07 2018 12:07PM | Last Updated: Jun 07 2018 12:07PMपुणे : प्रतिनिधी

राज्यात उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीच्या रकमेसाठी आता थांबणार नाही. येत्या 25 जून अखेर शेतकर्‍यांची थकीत एफआरपीची रक्कम दिली नाही तर 28 किंवा 29 जूनला पुण्यातील साखर आयुक्तालयास घेराव घालण्यात येईल आणि शेतकर्‍यांची रक्कम मिळाल्याशिवाय संकुलासमोरून उठणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शेट्टी यांनी पुढारी ऑनलाईनशी संवाद साधला त्‍यावेळी ते बोलत होते. 

‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा ठेका घेणारे शेतकर्‍यांसाठी कधीच आंदोलन करू शकत नसल्याची टीका त्यांनी सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना केली. ऊस गाळप हंगाम संपुष्टात आल्यानंतर एफआरपीचे एक हजार नऊशे कोटी रुपये थकीत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘दिल्लीत केंद्र सरकारकडे साखर उद्योगाच्या मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्राने काही धोरणात्मक निर्णय घेतल्याशिवाय यातून उत्तर निघणार नाही. त्याला आता गती मिळालेली आहे. 30 जूनला शेतकर्‍यांच्या कर्जाचे वर्ष संपते आणि तो थकबाकीत जाणार असल्याने रकमेसाठीच आम्ही घेराव घालणार आहोत.’’

सध्या सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपात  स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेच दिसत नसल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘शेतकर्‍यांसाठी होणार्‍या कोणत्याही आंदोलनाला आमचा विरोध नाही. संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे आणि तो पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतीमालास डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा या जुन्याच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतकरी चळवळीसाठी प्रभावी नेत्यांनी पुढे यावे    
खुली स्पर्धा असल्याने ज्याने त्याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करून नेतृत्व करावे.  शेतकर्‍यांना न्याय द्यायला आमची ताकद कमी पडते, हे प्रांजळपणे आम्ही कबूल करतो. आम्ही सक्षम असतो तर शेतकर्‍यांच्या एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी प्रभावी नेत्यांची गरज चळवळीला आहे. जे आणखी कोणी मागे राहिले असतील त्यांनी पुढे यावे आणि आपली क्षमता दाखवावी. त्याला आमचा विरोध नाही. त्यांनी शांततेने, चिकाटीने आंदोलन करून तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत जावे, असे शेट्टी म्हणाले.