Fri, Apr 26, 2019 16:00होमपेज › Pune › मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याची तयारी पूर्ण : राजू शेट्टी 

मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याची तयारी पूर्ण : राजू शेट्टी(व्हिडिओ)

Published On: Jul 03 2018 10:53PM | Last Updated: Jul 03 2018 10:45PMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारने कर्नाटकप्रमाणेच गाईच्या दुधाला शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर लिटरला पाच रुपये थेट अनुदान द्यावे. अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. परराज्यातूनही महाराष्ट्रात दूध येऊ देणार नसून दूध उत्पादक शेतकरी आता ‘करेंगे या मरेंगे’ या मनस्थितीत असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पुण्यात 29 जूनला साखरेच्या थकित एफआरपीच्या स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतलेली नसल्याने दूध आंदोलनाची तीव्रता वाढवून उपद्रवमुल्य दाखवून देऊ असेही ते म्हणाले.

सर्किट हाऊस येथे दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  शेतकरी दूध संकलन करणार नाहीत आणि विक्रीही करणार नाहीत. तसेच दूध रस्त्यावर ओतणार नाहीत. राज्यात गाईच्या दुधाचे रोजचे संकलन 1 कोटी 20 लाख लिटरइतके होत आहे. मुंबईच्या दिशेने जाणारे दूध सर्व बाजूंनी रोखणार आहोत. गुजरातहून येणारे दूध, नंदूरबार, धुळे, ठाणे, नाशिक, अहमदनगर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून मुंबईला जाणारे दूध स्वाभिमानीचे कार्यकर्ते रोखतील. गुजरात सरकारने दुधासाठी तीनशे कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यायचे म्हटल्यास रोजचे पाच कोटी रुपये लागतील. दुधाचे भाव स्थिरस्थावर होईपर्यंत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

केंद्रिय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांची भेट घेऊन दूध भुकटीचा राखीव साठा करण्याची मागणी केली होती. त्यावर वेळीच निर्णय झालेला नाही. जगभरात दूध व्यवसायात मंदी आहे. दूध धंद्याबाबत केंद्र सरकारने बेपवाईने पाहिले आहे. ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड देशात गाईची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जागतिक बाजारात जोपर्यंत दूध भुकटीचे भाव वाढत नाहीत, तोपर्यंत देशात दुधाचे भाव वाढणार नाहीत. त्यामुळे सरकारने स्वतः दूध भुकटी खरेदी करून तोट्यात विकणे आणि अतिरिक्त दूध पावडर साठा कमी करण्याची गरज आहे. देशातील शिल्लक साठ्यातील दूध पावडरची माहिती उपलब्ध होत नाही. गाईच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांची संख्या 50 लाखाच्या आसपास आहे. 2012 च्या एका अहवालानुसार राज्यात 21 लाख 33 हजार संकरित गायी आहेत. आज किती गाई आहेत, याची माहिती नाही.

कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दूध उत्पादकांच्या अडचणी केंद्र व राज्य सरकार सोडवित असल्याने आंदोलन करू नये, अशी भूमिका मांडली असल्याबद्दल विचारले असता खा. शेट्टी म्हणाले की, दूध उत्पादक शेतकर्‍यांचे संपूर्ण वाटोळे झाल्यानंतर उपाययोजना करणार का?  याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांनी एकत्र येऊन घेतली होती. सहा महिन्यानंतरही याबाबत कमिटी नेमली नाही आणि उपाययोजनाही केली नाही. त्यामुळे पाशा पटेल यांच्या भाबड्या आशेवर आम्ही कसे थांबणार? असा प्रश्‍नही उपस्थित केला.