Tue, Mar 26, 2019 20:15होमपेज › Pune › 'मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार' : शेट्टी     

'मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार' : शेट्टी     

Published On: Apr 12 2018 8:23PM | Last Updated: Apr 12 2018 8:23PMपुणे : प्रतिनिधी  

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अनोखे अभियान सुरू करत आहे. १ मे पासून 'मी आत्महत्या करणार नाही, तर मी लढणार' हे अभियान सुरू करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये, यासाठी हे अभियान सुरू करणार आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून या अभियानाला सुरुवात होईल. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये हे अभियान केले जाणार असून ९ मेला उस्मानाबाद येथे त्याची सांगता होईल.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व्हावा आणि शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन खाजगी विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस हंगामाचे गाळप संपल्यानंतर आठ दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजपकडून करण्यात आलेल्या उपोषणाबद्दल शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, भाजपकडून उपोषण करण्याचा प्रकार म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज को'. हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टिका शेट्टी यांनी केली.

यावेळी स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. तर रामटेक येथील माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी पक्षामध्ये प्रवेश केला.