Thu, Aug 22, 2019 13:13होमपेज › Pune › राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत 

राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत 

Published On: Feb 10 2018 6:28PM | Last Updated: Feb 10 2018 6:51PMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलाखत रद्द झाल्या नंतर पुन्हा एकदा २१ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा मुहूर्त मिळाला आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता ही जाहीर मुलाखत होणार असल्याचे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पुण्यामध्ये जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन १ ते ३ जानेवारी दरम्यान पार पडले. या कार्यक्रमात सुरवातीला ३ जानेवारीला ही मुलाखत होणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र काही कारणामुळे ६ जानेवारीला मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली. दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

अखेर या लक्षवेधी मुलाखतीसाठी २१ फेब्रुवारीचा मुहूर्त सापडला आहे. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ५० वर्ष आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांची आगळी वेगळी मुलाखत घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून कोण असावे यावर मोठा खल झाला आणि अखेर राज ठाकरे यांचे नाव समोर आले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या मुलाखतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष मुलाखतीचा योग जुळून आला नव्हता.