Mon, Apr 22, 2019 22:22होमपेज › Pune › असा असावा पावसाळ्यातील आहार

असा असावा पावसाळ्यातील आहार

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी 

पावसाळ्यात आरोग्याच्या जास्त तक्रारी ऐकायला मिळतात. अनेक आजार उद्भवतात. पाण्यातून होणार्‍या जंतूंचा प्रादुर्भाव तसेच गारवा या कारणांमुळे सर्दी, खोकला अशा आजारांसह व्हायरल इंन्फेक्शनचे प्रमाणही वाढत असल्यामुळे या वातावरणात आहारात बदल करून आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळयात काय खावे आणि खाऊ नये याची पथ्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पाळली तर पावसाळा आनंदी आणि आल्हाददायक होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ या काळात खाऊ नयेत. ताजे बनवलेले पदार्थ खायला हवेत. ताजी फळं आणि भाज्या यासाठी हा पावसाळ्याचा सिझन बेस्ट. पण, या भाज्या आणि फळं खाण्याआधी नीट स्वच्छ धुवून घ्या. पावसाळ्यात पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते. म्हणूनच कमीत कमी तेल असणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश करा.भाजलेले आणि फ्राय केलेल्या पदार्थांना जास्त पसंती द्या.

पचन संस्थेचं कार्य नीट चालावं, यासाठी फायबर आवश्यक आहे. तसंच घातक विषाणूंचा सामनाही फायबरमुळे करता येतो. याशिवाय दही, योगर्ट यांचाही आहारात विशेष समावेश करावा. रस्त्यावरील भेळ, पाणीपुरी, चाट आदी पदार्थांना कात्री लावलेली चांगली. कारण यातील पाणीही  अशुद्ध असण्याची शक्यता आहे.

पावसाळयात पचनक्रिया मंदावते. यामुळे कमी प्रोटीन असलेला शाकाहार घ्यावा. शाकाहारामध्येही कडधान्ये व पालेभाज्या हा जास्त प्रोटीन असलेल्या भाज्या वगळता कमी प्रोटीन असलेल्या कोबी, भोपळा, फ्लॉवर, बटाटा, दोडका या फळभाज्यांचा आहारात समावेश असावा. पालेभाज्या व कडधान्ये हे पचायला जड असतात आणि त्यापासून जुलाबही होउ शकतात. तसेच पचायला जड असणारे आणि जास्त प्रोटीन असलेला मांसाहार शक्यतो टाळावा. बाहेरचे खाणे टाळावे. -डॉ. प्रविण दरक, अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे