Tue, Mar 19, 2019 09:24



होमपेज › Pune › विदर्भ, मराठवाड्यात सोमवारीही वादळी पाऊस 

विदर्भ, मराठवाड्यात सोमवारीही वादळी पाऊस 

Published On: Feb 11 2018 4:08PM | Last Updated: Feb 11 2018 4:08PM



पुणे: प्रतिनिधी 

विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी उद्या (सोमवारी, दि. 12) वादळी वार्‍यांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. 

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातून मराठवाडा, विदर्भाच्या दिशेने येणारे अतिउष्ण वारे, त्याचप्रमाणे स्थानिक वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस पडत आहे, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

दरम्यान, पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी रविवारी गारांसह मुसळधार पाऊस पडला. गारपिटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते, असे  हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 

नीचांकी किमान तापमानाची नोंद जळगाव येथे 12 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. मुंबई 17.8, रत्नागिरी 17.3, पुणे 13.3, कोल्हापूर 18.1, नाशिक 12.1, सांगली 16.1, सातारा 14, सोलापूर 18.2, औरंगाबाद 14.6, नागपूर 15.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.