Thu, Nov 15, 2018 10:14होमपेज › Pune › बारामती तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका

बारामती तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका

Published On: May 28 2018 4:11PM | Last Updated: May 28 2018 4:11PMबारामती : प्रतिनिधी 

बारामती शहर आणि तालुक्याला रविवारी (दि. २७)  जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. बारामती शहरात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. काही घरांवरील पत्रे उडून गेले. शहर आणि तालुक्यात बत्ती गुल झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अर्ध्या तासाहून अधिक काळ वादळी वाऱ्याचा कहर सुरु होता. परंतु पाऊस झाला नाही. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वीजा आणि वादळाने तालुक्यातील नागरिकांची अनेक घरे पडून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. वादळ एवढे प्रचंड होते की घराचे पत्र शंभर ते दोनशे फुटापर्यंत उडून गेले आहेत. 

मागील चार दिवसांपासून प्रचंड उन्हाने नागरीक हैराण झाले असून पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. बारामती शहर आणि परीसरात रविवारी अर्धा तास हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र पावसापेक्षा वादळ आणि वीजानीच नागरीकांचा जीव भयभीत झाला. शहरातील जळोची येथील काही घरांचे पत्रे उडून गेले आहेत. भिगवण रस्ता, कसबा, इंदापूर रस्त्यावरील अनेक झाडांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत ठिकठिकाणी झाडांचा पालापाचोळा आणि झाडांच्या फांद्यांचा खच पडला आहे.

फलटण रस्त्यावरील सातववस्ती परीसरात सहा घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मळद, सातववस्ती येथील पडलेल्या घरांचे तलाठी आणि प्रशासनाने पंचनामा केला आहे. शहरातील कसबा, अप्पासाहेब पवार मार्ग, हरीकृपानगर, इंदापूर रोड टोलनाका, भिगवण रस्ता, माळावरची देवी परिसर, रुई पाटी, पेन्सिल चौक, जळोची या भागात अधिक प्रमाणात नुकसान झाले. रात्री वीज नसताना पालिकेकडून अथक परिश्रमाने काही झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली. तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, विजय शितोळे, मज्जिद पठाण, जमाल शेख, मोहन शिंदे, राजेश लोहाट, निवृत्ती जाधव, शैलेश सोनवणे, महेश बिवाल, गणेश जगताप, अक्षय माने, निखिल कागडा,आकाश  पोळके, उमेश लालबिगे,आप्पा शेळके आदींनी शहराच्या विविध भागात जात उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला केले. बारामती तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली आहे.