Thu, May 28, 2020 16:40होमपेज › Pune › पुण्यात बरसल्या सरींवर सरी

पुण्यात बरसल्या सरींवर सरी

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
पुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर व परिसरात बुधवारी सरींवर सरी बरसल्या. सकाळपर्यंत निरभ्र असणारे आकाश दुपारी ढगाळ बनले. त्यानंतर शहराच्या बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पुणेकरांना पहिल्या-वहिल्या पावसाळी दिवसाचा फील मिळाला. हा पाऊस हलक्या स्वरूपाचा होता. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) 2 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्वच होता, असे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले. 

पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला असून कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. मंगळवारच्या 36.5 अंशांवरून तब्बल 5.3 अंशांची घट होत बुधवारी कमाल तापमानाचा पारा 31.2 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला गेला. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून बर्‍याच दिवसांनी सुटका झाली. दरम्यान, वायू चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त ढगांची निर्मिती झाली असून त्यामुळे शहरात बुधवारी पाऊस पडल्याचे नमूद करण्यात आले. पुढील 2-3 दिवस शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 36.2 मि.मी. पाऊस पडला असून सरासरीपेक्षा तो तब्बल 17.7 मि.मी. ने कमी आहे.