होमपेज › Pune › ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय 

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय 

Published On: Feb 04 2018 8:55PM | Last Updated: Feb 04 2018 8:55PMपुणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या परळ आणि करी रोड रेल्वे स्थानक येथे पादचारी पुलाच्या कामाकरिता पुणे-मुंबई लोहमार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी (दि. ४) ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या व रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. परिणामी रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत घट होऊन एसटी स्थानकांवर नेहमीपेक्षा दुपटीहून अधिक प्रवाशांची गर्दी दिसून आली.

कामानिमित्त पुणे ते मुंबई दरम्यान अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. तसेच या एक्स्प्रेस गाड्यांनी पुणे ते लोणावळा, पुणे ते कर्जत आणि मुंबई ते लोणावळा, मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. ब्लॉकमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा असा प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांची रविवारी गैरसोय झाली. 

सहा ते आठ तासांच्या ब्लॉकसाठी आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ब्लॉकमुळे चेन्नईहून मुंबईला जाणारी चेन्नई एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी कल्याण स्थानकापर्यंतच धावली. तर मुंबईवरून सुटणारी नागरकोईल एक्स्प्रेस दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी चार वाजून २५ मिनिटांनी, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस दुपारी १२.४५ ऐवजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी, मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस दुपारी २ ऐवजी ५ वाजून ५० मिनिटांनी, मुंबई-कोणार्क एक्स्प्रेस ३ वाजून २० मिनिटांनी सुटल्या. या रेल्वे मुंबईवरून नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्याने पुणे रेल्वे स्थानकाला पोहोचण्यास त्या प्रमाणात उशीर झाला. या काळात रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला व त्यामुळे नाहक मनस्ताप झाल्याचे काही प्रवाशांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.