Fri, Apr 26, 2019 20:16होमपेज › Pune › पुण्यातही भिकार्‍यांचे मोठे रॅकेट 

पुण्यातही भिकार्‍यांचे मोठे रॅकेट 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:29AMपुणे : विजय मोरे

शहर आणि उपनगरात भिकार्‍यांचे मोठे रॅकेट काम करते आहे. बाहेरगावाहून दहा ते पंधरा हजार रुपयांत लंगडे, पांगळे भिकारी विकत आणून, त्यांच्याकडून दररोज किमान हजार रुपये भिकेपोटी सक्तीने वसूल करणारी मोठी टोळी कार्यरत असून, या टोळीकडून हजार रुपयांची भीक न देणार्‍या भिकार्‍यांना बेदम चोप देण्याचे प्रकार सर्रास पहावयास मिळत आहेत.

पुणे शहर आणि उपनगर झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येबरोबर गेल्या तीन-चार महिन्यांपासून वर्दळीच्या चौका-चौकात भिकार्‍यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. या अचानक दिसू लागलेल्या भिकार्‍यांबाबत माहिती घेतली असता धक्कादायक सत्य समोर आले आहे. झाले असे की, लक्ष्मीनारायण चौकात चार-पाच जण एका लंगड्या भिकार्‍याला बेदम चोप देत होते.

त्यावेळी कारमधून जाणार्‍या चौघे त्या भिकार्‍याची केविलवाणी अवस्था पाहू न शकल्याने, त्यांनी कारमधून उरून मारहाण करणार्‍या चौघांना चोप दिला व त्यांना पिटाळून लावले. त्यावेळी त्यांनी त्या भिकार्‍याकडे ते लोक तुला मारहाण का करीत होते, याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, आज हजार रुपये भीक मिळाली नाही, म्हणून ते लोक मारहाण करीत  होते. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथून मला 15 हजारात विकत आणले आहे. दररोज हजार रुपये भीक मिळवून दयायचीच. न दिल्यास ते लोक बेदम चोप देतात व रात्रीचे जेवणही देत नाही, असेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने शहरातील स्वारगेट, पुणे एसटी स्टॅण्ड, महालक्ष्मी मंदिर चौक, कोंढवा पूल, महात्मा गांधी रोड, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, डेक्कन परिसरातील चौका-चौकात भीक मागणार्‍यांकडे विचारपूस केली. त्यावेळी या लंगड्या, पांगळ्या भिकार्‍यांना औरंगाबाद, यू. पी., बिहार, नागपूर, पंढरपूर, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांतून 10 ते 15 हजार रुपये देऊन शहरात भिकार्‍यांचे रॅकेट चालविणार्‍या टोळीने विकत आणल्याचे धक्कादायक आणि भयाण वास्तव समोर आले.

विशेष म्हणजे या भिकार्‍यांच्या रॅकेटने सुमारे 150 ते 200 भिकारी विकत आणलेले आहेत. वर्दळीच्या चौकात उभे राहणार्‍या भिकार्‍यांनी दररोज हजार रुपये देणे सक्तीचे आहे. सातशे-आठशे रुपये जरी भीक मिळाली तरी, हे रॅकेट चालविणारे त्या भिकार्‍यांना बेदम मारहाण करतात. अपंग, लंगडे, पांगळे भिकारी दररोज हजारो रुपये भीक मागून या रॅकेटला देतात. मुंबईच्या एका भिकार्‍याकडून हे रॅकेट चालविले जात आहे, असेही काही भिकार्‍यांनी सांगितले. दिल्ली, मुंबई शहरात हे भिकारी रॅकेट चालविले जात होते हे उघड वास्तव आहे.