Sun, May 26, 2019 10:40होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाच्या ‘कनेक्टिव्हिटी’साठी रस्त्यांचा विस्तार

पुरंदर विमानतळाच्या ‘कनेक्टिव्हिटी’साठी रस्त्यांचा विस्तार

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी    

पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी आवश्यक त्या ‘कनेक्टिव्हीटी’साठी विविध मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये  हडपसर- सासवड, उरुळी- सासवड मार्गासह अस्तित्वात असलेल्या पाच मार्गांचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि ‘डॉर्श’ कंपनीच्या अधिकार्‍यांची विमानतळाला भौतिक सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये विमानतळाला वीज पुरवठा कुठून करता येईल, पाणीपुरवठा करणे, विमानतळाला जोडणारे रस्ते कसे असणार, विमानतळाचे प्रवेशद्वार कुठे असणार यावर चर्चा करण्यात आली.  

जिल्हाधिकारी राव म्हणाले, विमानतळाला जाण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असून, त्यासाठी हडपसर ते सासवड आणि फुरसुंगी ते सासवड या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण करावे लागणार आहे. त्यासोबतच पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळ (एमआयआरडीसी) रिंगरोड तयार करत आहेत. याबरोबरच अन्य काही रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. विमानतळाला वीर, नाझरे धरण किंवा थेट निरा नदीतून पाणीपुरवठा करता येतो का, याचा अभ्यास केला जाणार आहे. हे करताना पुढील 20 वर्षांसाठीचे नियोजन केले जाणार आहे. सध्या या धरणातील किती टीएमसी पाणी आरक्षित असून त्यातील किती पाणी घेता येईल, यासाठी  किती निधीची आश्यकता असेल, याचादेखील  डॉर्श कंपनी अभ्यास करणार आहे.

भूसंपादनासाठी शेतकर्‍यांसमोर चार पर्याय ठेवले आहेत. जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी अदा करणे, निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणे, जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणे किंवा जमीन लीजवर घेणे हे पर्याय आहेत. शेतकर्‍यांची नाराजी असून, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असा विश्‍वास राव यांनी व्यक्त केला आहे.