Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाचे टेक-ऑफ

पुरंदर विमानतळाचे टेक-ऑफ

Published On: Apr 24 2018 1:49AM | Last Updated: Apr 24 2018 1:44AMपुणे : प्रतिनिधी

पुरंदर येथील श्री छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेला सोमवारी केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावर्षी जानेवारीत तब्बल दहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यापाठोपाठ केंद्राने साइट क्‍लिअरन्स दिल्याने अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पडला. यामुळे पुरंदर विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. विमानतळासंदर्भातील भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारकडून लवकरच काढली जाईल. त्या पाठोपाठ भूसंपादनाची अधिसूचना काढली जाऊन विमानतळ कामाचे टेक-ऑफ होईल. जागेला मंजुरीनंतर पर्यवरणीय मंजुरीत फारशा अडचणी येत नसल्याने हरकती न आल्यास आता ती फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 

पुरंदर विमानतळासंदर्भात सोमवारी,23 एप्रिल  रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत  विविध तांत्रिक मुद्यांवर चर्चा झाल्याचे सुरेश कंकानी यांनी सांगितले. पुरंदर विमानतळासाठी आवश्यक प्रशासकीय बाबी आणि भूसंपादना साठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस ‘विशेष प्राधिकरणा’चा दर्जा देण्याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. प्रशासकीय बाबी; तसेच भूसंपादन, शेतकर्‍यांना द्यावयाच्या मोबदल्याच्या पर्यायांना मान्यता, जिल्हाधिकार्‍यांना भूसंपादनाचे अधिकार, विमानतळ होणार असलेल्या हद्दीतील गावांची अधिसूचना जाहीर करणे याबाबतही चर्चा करण्यात आली.