होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाला रिंगरोडने जोडणार : गित्ते

पुरंदर विमानतळाला रिंगरोडने जोडणार : गित्ते

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी 

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला रिंगरोडपासून नवीन रस्ता तयार करून जोडण्यात येणार आहे. हे अंतर 18 किमी असून, त्याकरिता पुणे महानगर प्राधिकरणाने तीन पर्याय सूचविले आहेत. पैकी एका पर्यायावर शिक्‍कामोर्तब होणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्‍ते यांनी दिली. 

पुरंदर विमानतळ ते रिंगरोड अंतर अठरा किलोमीटरचे आहे. ते अंतर जोडण्यासाठी पुणे महानगर प्राधिकरणाने नियोजन केले आहे. दिवेघाट, सिंदवणे घाट, बोपदेव घाटातून हा रस्ता जोडण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील एक रस्ता निवडून विमानतळापर्यंत जोडण्यात येणार असल्याचे गित्‍ते यांनी सांगितले. पुरंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वारगेटपासूनचे अंतर केवळ 35 किलोमीटर राहणार असल्याने आणि तीन मार्गांनी तेथे पोचणे शक्य असल्याने, पुणेकरांची सोय होणार आहे. तसेच प्रस्तावित रिंग रोडमुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील रहिवाशांनाही तिथे सहज पोचता येणार आहे. 

पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, पारगाव परिसरांतील जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित झाली आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकापासून हडपसरमार्गे सासवड चौकापर्यंतचे अंतर  45 किलोमीटर आहे. सासवड चौकातून डाव्या बाजूस वळल्यानंतर अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर एखतपूर व त्यापुढे पारगाव येते. त्यामुळे पुण्यातून हा सर्वांत जवळचा मार्ग ठरेल.  सोलापूर रस्त्याने उरुळी कांचन येथून राजेवाडीला फाटा फुटतो. उरुळी कांचन येथून 17 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. शिवाजीनगर ते उरुळी कांचन 30 किलोमीटर आणि तेथून राजेवाडी 17 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर दोन किलोमीटरने अधिक असले, तरी सोलापूर रस्ता सहापदरी असल्यामुळे कमी वेळात हे अंतर कापता येईल. 

सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडील बाजूने खेडशिवापूर-सासवड लिंक रोडचा पर्याय आहे. पुण्यापासून खेड-शिवापूर हे अंतर 26 किलोमीटर आहे, तर तेथून कासुर्डी, वारवडी, गराडे कोडीत मार्गे सासवड हे अंतर 22 किलोमीटर आहे. तेथून दहा किलोमीटर अंतरावर पारगाव आहे. साधारणपणे या मार्गाने विमानतळ हे 58 किलोमीटर अंतरावर पडणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंग रोड झाल्यावर विमानतळासाठी आणखी पर्यायी मार्ग उपलब्ध होतील. हा मार्ग विकसित झाल्यानंतर नगर, सोलापूर, सातारा, मुंबई हे रस्ते जोडले जातील. हा रिंग रोडही विमानतळाच्या जवळून जाईल. त्यामुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील नागरिकांना विमानतळ जवळ पडणार आहे.