होमपेज › Pune › जि.प. ४३ दिवसांत करणार ११६ कोटी खर्च 

जि.प. ४३ दिवसांत करणार ११६ कोटी खर्च 

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:21AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील गावोगावचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेला 2017-18 या अर्थसंकल्पात मिळालेला सर्व निधी खर्च करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले तर त्यांना पुढील 43 दिवसांत 116 कोटी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. एवढ्या कमी कालावधीत हा निधी खर्च झाल्यास कामाचा आणि वस्तूंचा दर्जा कसा राखला जाणार, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा निधीच खर्च होणार नाही, असा काही जिल्हा परिषद सदस्यांचा दावा आहे. 

2017-18 मध्ये 168 कोटी 70 लाखांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर केला होता; मात्र निधी खर्च करण्याबाबत बहुतांश विभागाच्या उदासीनतेमुळे विकासकामांना आडकाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे जानेवारी 2018 अखेर विविध विभागांतर्गत अवघा 31 टक्के निधीचा खर्च करण्यात आला आहे. सुट्या वगळून फेब्रुवारी महिन्यातील कामकाजाचे 20 दिवस आणि मार्च महिन्यात 23 दिवसांत उर्वरित 69 टक्क्यांचा निधी खर्च करण्याचे दिव्य बांधकाम, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, पंचायत, पाटबंधारे, समाजकल्याण, वैद्यकीय विभागाला पार पाडावे लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या वतीने मांडण्यात आलेल्या 168 कोटी 70 लाखांच्या अर्थसंकल्पात जानेवारी 2018 अखेर खर्च 52 कोटी 45 लाख 77 हजारांचा निधी करण्यात आला आहे. उर्वरित 116 कोटी 25 लाखांचा निधी खर्च करण्यासाठी विविध विभागप्रमुखांची धावपळ मार्च महिनाअखेर सुुरू झाली आहे. 

दरम्यान राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कचा निधी वेळेत मिळाल्यानंतरही योजनांवर निधी खर्च करण्यास दिरंगाई झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे; त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान, जिल्ह्यातील विकासकामांच्या निधीचा ख्वाडा निर्माण झाला आहे. मार्च महिन्यातील प्रशासकीय कामकाजाचे अवघे 10 दिवस शिल्लक राहिल्यामुळे अर्थसंकल्पातील फक्त 60 ते 70 टक्क्यांचा निधी खर्च होण्याची शक्यता एका अधिकार्‍याने व्यक्त केली आहे; त्यामुळे उर्वरित 30 टक्के खर्च न होण्यास जबाबदार कोण आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात दक्षिण बांधकाम विभागासाठी 23 कोटी 53 लाख 93 हजारांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी जानेवारी अखेर 16 कोटी 10 लाखांचा खर्च करण्यात आला आहे; तर उत्तर बांधकाम विभागासाठी 19 कोटी 80 लाखांच्या तरतुदीपैकी 10 कोटी 21 लाखांचा निधी खर्च झाला आहे. शिक्षण विभागासाठी 16 कोटी 5 लाखांच्या तरतुदीपैकी 3 कोटी 5 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे 42 दिवस कामकाजामध्ये 116 कोटींचा खर्च करताना पदाधिकार्‍यांची दमछाक होणार आहे. 

निधी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार मार्च महिनाअखेर विविध विभागांतील खर्च करण्यात येणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात अनेक योजनांसाठी निधी खर्च करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

 

Tags : pune, pune news, pune zp, funds,